भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे दोन्ही देशांमधल्या क्रिकेटप्रेमींबरोबरच जगभरातल्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. त्यामुळेच या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. रविवारी आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर पुन्हा एकदा पावसानं पाणी फेरलं. पण हा सामना आता राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवला जाणार आहे. मात्र, या सर्व चर्चेदरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमने सांगितलेला एक किस्सा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

वासिम अक्रम आपल्या भेदक गोलंदाजीनं समोरच्या फलंदाजांच्या छातीत धडकी भरवत होता असं आजही अनेक समकालीन फलंदाज सांगतात. त्यामुळे वासिम अक्रमच्या गोलंदाजीचा सामना करणं म्हणजे त्या काळातील फलंदाजांसाठी एक मोठं खडतर आव्हानच ठरत असे. पण आता त्याच वासिम अक्रमला त्याच्या स्वप्नातही भारताची रन मशिन अर्थात विराट कोहली दिसतोय! खुद्द वसिम अक्रम यानेच आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी झालेल्या कार्यक्रमात यासंदर्भात खुलासा केला आहे. ही बाब त्यानं खुद्द विराटलाही सांगितल्यावर विराटनंही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

शोएब अख्तर म्हणतो, “शेवटी आम्हाला पावसानं वाचवलं”; रोहित-गिलच्या स्फोटक खेळीनंतर दिली प्रतिक्रिया…

आशिया चषकातील रविवारचा सामना पावसामुळे आज राखीव दिवशी खेळवला जाणार असला, तरी वासिम अक्रमच्या या किश्श्यामुळे दोन्ही बाजूच्या क्रीडाप्रेमींमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सामन्याच्या आधी झालेल्या कार्यक्रमात बोलताना वासिम अक्रम म्हणाला, “आज मी जेव्हा इकडे येत होतो, तेव्हा वाटेत मला विराट कोहली दिसला. मी त्याला म्हणालो की तू आता माझ्या स्वप्नांमध्येही मला दिसतोस. त्यावर विराट म्हणाला तुम्ही हे काय म्हणताय वासिम भाई? मी त्याला म्हटलं, कारण आजकाल मी तुला इतक्या वेळा टीव्हीवर बघतो. मला तुला माझ्या डोक्यातून बाहेर काढताच येत नाहीये!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट, बाबर हे मॅचविनर्स – वासिम अक्रम

दरम्यान, यावेळी बोलताना वासिम अक्रमनं विराट कोहली व बाबर आझमचं कौतुक केलं. “विराट, बाबर, शाहीन हे सगळे मॅचविनर खेळाडू आहेत. हे सगळे या क्षणासाठीच क्रिकेट खेळतात. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना! हे सामने म्हणजे आर या पार असतात”, असं वासिम अक्रम म्हणाला.