What Are The Rules Of IPL’s Trading Window: संजू सॅमसनचा संघ आगामी आयपीएल २०२६ पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. स्वत: संजूने राजस्थानकडे त्याला रिलीज करण्याची किंवा ट्रेड करण्याची मागणी केल्याचं समजत आहे. पण राजस्थान रॉयल्सने याबाबत कोणतीही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान संजू सॅमसनला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक फ्रँचायझी तत्पर आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचं नाव आघाडीव आहे.

संजू सॅमसन आयपीएल ट्रेड विंडोद्वारे राजस्थानच्या संघातून चेन्नईच्या ताफ्यात सामील होण्याची चर्चा सुरू आहे. पण ही ट्रेड करण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे, जाणून घेऊया.

आयपीएलमध्ये ट्रेड प्रक्रियेद्वारे आणखी एका मोठ्या खेळाडूची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पंड्याला ट्रेड विंडोद्वारे आपल्या संघात घेतलं होतं. आता पुढील हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सकडून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला ट्रेड करण्याची चर्चा रंगली आहे.

IPL ट्रेड विंडोचे नियम काय आहेत?

आयपीएलच्या दोन हंगामांदरम्यान खेळाडूंना एका संघातून दुसऱ्या संघात ट्रेड (अदलाबदल/विक्री) करण्यासाठीचा अधिकृत कालावधी म्हणजे ट्रेड विंडो असते. ट्रेडसाठी खेळाडू आणि दोन्ही संघांची संमती असणं आवश्यक आहे. बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची मंजुरीही महत्त्वाची असते. आयपीएल ट्रेड विंडो ही हंगाम संपल्यानंतर आणि दुसरा हंगामाचा लिलाव होण्यापूर्वी एक आठवडा आधीपर्यंत सुरू असते.

२०२६ च्या लिलावानंतर दुसऱ्या दिवशी ही विंडो पुन्हा सुरू होते आणि हंगाम सुरू होण्याच्या ३० दिवस आधी (भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५:०० वाजता) पर्यंत सुरू असते. महत्त्वाचं म्हणजे लिलावात खरेदी-विक्री केलेल्या खेळाडूंना ट्रेड करता येत नाही.

ट्रेडचे प्रकार

वन-वे ट्रेड – एक संघ दुसऱ्या संघाकडून पैसे देत खेळाडू खरेदी-विक्री करतो.

टू वे ट्रेड – टू वे ट्रेडमध्ये दोन्ही संघ आपआपल्या संघातील खेळाडूंची अदलाबदली करतात.

मुंबई इंडियन्सने २०२३ मध्ये वन वे ट्रेड प्रक्रिया वापरत हार्दिक पंड्याला १५ कोटींना गुजरातच्या ताफ्यातून मुंबईच्या संघात सामील केलं होतं. पण यावेळेस मात्र टू वे ट्रेड होण्याची शक्यता आहे. कारण संजू सॅमसन आणि आर अश्विन या दोन खेळाडूंची ट्रेडसाठी जोरदार चर्चा सुरू आहे.