Sarfaraz Khan Not Selected For India A: भारतीय संघातील स्टार फलंदाज सर्फराज खान हा सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. सर्फराजला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण गेल्यावर्षी मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर त्याला पुन्हा एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याला संघात स्थान दिलं गेलं होतं,पण प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता भारतीय अ संघात देखील त्याला स्थान देण्यात आलेलं नाही.

दक्षिण आफ्रिका ए संघाविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंपेक्षा वगळण्यात आलेल्या सर्फराज खानची जोरदार चर्चा रंगली आहे. सर्फराज खानने आपल्या फलंदाजीसह फिटनेसवरही अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. असं असतानाही त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. आता याबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे.

काही दिवसांपू्र्वी वेस्ट इंडिजचा संघ २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात सर्फराज खानला संधी दिली गेली नव्हती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. मात्र असं असतानाही त्याला सातत्याने दुर्लक्ष का केलं जात आहे? याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सरफराज खानला आधी असे संकेत मिळाले होते की, त्याची वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड होणार आहे. पण संघाची घोषणा झाली, त्यावेळी त्याचं नाव नव्हतं.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, निवड समितीने २५ सप्टेंबला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. २ दिवसानंतर सर्फराज खानने फिटनेस चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. सर्फराज खानला COE (सेंटर ऑफ एक्सेलन्स) फिटनेस सर्टिफिकेट दिलं नव्हतं. त्याला का निवडलं गेलं नाही? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ नये, म्हणूनच त्याला इंग्लंड ए विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय अ संघात स्थान दिलं गेलं होतं.

सर्फराजला संधी न मिळण्याचं कारण काय?

पीटीआयच्या वृत्तानुसार, निवड समितीतील काही सदस्यांना वाटतंय की सर्फराज खानला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळायला हवी. सध्या या स्थानावर साई सुदर्शनला सातत्याने संधी दिली जात आहे. दक्षिण आफ्रिका अ विरूद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय अ संघात ऋषभ पंतची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून साई सुदर्शनची निवड करण्यात आली आहे. निवडकर्त्यांना असं वाटतंय की, सर्फराजला भारतीय संघात ५ किंवा ६ क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही. या क्रमांकावर खेळण्यासाठी अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे सर्फराज खानला अजिंक्य रहाणेसोबत बोलून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार आहे.