संदीप गोपाळ
वेस्ट इंडिज संघाचा भारत दौरा विजयाविनाच संपला. भारताविरुद्धचा वेस्ट इंडिजचा हा सलग दहावा मालिका पराभव आहे. गेल्या १५ वर्षात वेस्ट इंडिजची एवढी वाताहत का झाली आहे? अनेक युवा खेळाडू वेस्ट इंडिजसाठी खेळण्याऐवजी निवृत्ती पत्करून जगभरात टी२० लीग खेळत आहेत. नेमकं काय बिनसलंय वेस्ट इंडिज संघाचं ते समजून घेऊया. गतवैभवाचा वारसा अस्तंगत झालेला संघ असं वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचं वर्णन होतं. एकेकाळी जागतिक क्रिकेटवर वेस्ट इंडिजचा दबदबा होता. १९७५ आणि १९७९ असे सलग दोन विश्वचषक त्यांनी पटकावले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा सामना करताना प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज अक्षरक्ष:चळचळा कापत असतात.मैदानावर उतरले की जिंकणारच एवढंच समीकरण असायचं. व्हिव रिचर्ड्ससारखा मातब्बर फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा खरपूस समाचार घ्यायचा.पण कालौघात वेस्ट इंडिजने हे वर्चस्व गमावलं.
आता वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका म्हणजे प्रतिस्पर्धी संघ जिंकणं ही निव्वळ औपचारिकता असते. भारताविरुद्धच्या मालिकेत अहमदाबाद कसोटी तर अडीच दिवसात आटोपली. दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजने प्रतिकार केला. पण या कसोटीत त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. वेस्ट इंडिजचे खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक बदलत जातात पण पराभवाची परंपरा खंडित होत नाही. वेस्ट इंडिजचा संघ एवढा रसातळाला का गेला आहे? याची कारणं जटिल आहेत. काही प्रश्न तर कधीच न सुटणारे असे आहेत.
गतवैभवाच्या कालखुणा
गेल्या १५ वर्षात वेस्ट इंडिजची वाताहत प्रकर्षाने जाणवणारी आहे. २०१० पासून वेस्ट इंडिजने १२७ टेस्ट खेळल्या असून त्यापैकी केवळ ३३ टेस्ट जिंकल्या आहेत. या काळात त्यांनी विदेशात ६१ टेस्ट खेळल्या असून, त्यापैकी ११ मध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने भारतात शेवटची टेस्ट २००२ मध्ये जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेला २००७ नंतर ते हरवू शकलेले नाहीत.या १५ वर्षात त्यांनी ऑस्ट्रेलियाला आणि श्रीलंकेला केवळ एकदा नमवलं आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध त्यांनी संघर्ष करत विजय मिळवले आहेत पण बाकी संघांविरुद्ध त्यांची कामगिरी सर्वसाधारण अशीच राहिली आहे. टेस्ट हे त्यांचं प्राधान्य नाही हे त्यांच्या सुमार कामगिरीवरून स्पष्ट झालं. याच काळात त्यांनी दोन टी२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं. पण हे असलं तरी २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिजचा संघ पात्रही ठरू शकला नाही ही नामुष्की आहे. २०२२ टी२० वर्ल्डकपसाठीही ते पात्र ठरू शकले नाहीत.
सहआयोजक या नात्याने २०२४ मध्ये झालेल्या टी२० वर्ल्डकपासाठी ते पात्र ठरले. पण सुपरएट फेरीतच त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. काही दिवसांपूर्वीच जागतिक क्रिकेटच्या पटलावर पाऊल ठेवलेल्या नेपाळने वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला. टेस्ट क्रिकेटमध्ये १०००पेक्षा जास्त धावा करताना ४०ची सरासरी असणारा ख्रिस गेल हा शेवटचा खेळाडू आहे. कर्टली ॲम्ब्रोज आणि कोर्टनी वॉल्श निवृत्त झाल्यानंतर ३०पेक्षा कमी सरासरीने १०० विकेट्स पटकावणारा केमार रोच हा वेस्ट इंडिजचा एकमेव बॉलर आहे.
बास्केटबॉल, ॲथलेटिक्स आणि फुटबॉलचं प्रलोभन
वेस्ट इंडिज हा देश नाहीये तर कॉन्फडरेशन आहे. अनेक देशरुपी बेटांचा समूह आहे. बाकी खेळांमध्ये हे देश स्वतंत्रपणे प्रतिनिधित्व करतात. क्रिकेटमध्ये मात्र सगळ्या बेटांचा मिळून वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरतो. बाकी खेळांकडे ओढा वाढल्याने क्रिकेट खेळण्यास उत्सुक युवा खेळाडूंची संख्याच कमी होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. बास्केटबॉल हा या भागातला लोकप्रिय खेळ. अमेरिकन नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन या लीगने वेस्ट इंडिजमधल्या युवा खेळाडूंना आकर्षित केलं. यानंतर ॲथलेटिक्सने कॅरेबियन बेटांवरच्या खेळाडूंना भुरळ घातली. जगातला वेगवान धावपटू उसेन बोल्ट अगदी सुरुवातीच्या काळात क्रिकेट खेळत असे. जमैका एकेकाळी फास्ट बॉलर्सची नर्सरी मानली जात असे. मायकेल होल्डिंग, कोर्टनी वॉल्श, पॅट्रिक पॅटरसन यांची कर्मभूमी असलेल्या जमैकात आता जगातले अव्वल धावपटू घडतात. ॲथलेटिक्समध्ये कष्टाला मोल आहे. डोक्याला ताप कमी आहेत आणि राजकारणही फार नाही असं मत वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज विन्स्टन बेंजामिन यांनी व्यक्त केलं होतं. त्यांचा मुलगा राय याने ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं होतं. केशरॉन वॉलकॉट हा भालाफेकीत निष्णात होण्यापूर्वी क्रिकेटच खेळत असे. फुटबॉल या भागात लोकप्रिय झाला. त्रिनिदादचा ड्वाईट योर्क हा पॉप्युलर कल्चरचा भाग झाला होता. क्रिकेटच्या अधोगतीसाठी बाकी खेळांच्या लोकप्रियतेचं कारण देणं ही केवळ सबब आहे असं वेस्ट इंडिजचे माजी महान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स यांनी म्हटलं होतं. वेस्ट इंडिज क्रिकेटने खेळाच्या वाढीसाठी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा होता. युवा प्रतिभाशाली खेळाडूंना घडवण्यासाठी, त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी चांगले उपक्रम हाती घ्यायला हवे होते. नव्वदीच्या दशकात बाकी खेळांची लोकप्रियता वाढत असताना वेस्ट इंडिज क्रिकेटच्या प्रशासकांनी काहीही ठोस असं केलं नाही. त्यातूनचा हा धोरण लकवा पुढच्या कार्यकारिण्यांमध्येही वाढत गेला.
वेस्ट इंडिजची एकत्रित लोकसंख्या पाच लाखांच्या आसपास आहे. यापैकी अनेकजण अमेरिका तसंच युकेत स्थलांतर करतात. कॅरेबियन पार्श्वभूमी असलेले खेळाडू अमेरिकेतील ॲथलेटिक्स तसंच युकेतल्या फुटबॉलमध्ये दिसणं स्वाभाविक आहे. कोल पालमर, ऑली वॉटकिन्स, जेडन सॅन्चो, मार्कस रॅशफोर्ड ही काही प्रातिनिधिक नावं. इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर तसंच अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेल हे मूळचे बार्बाडोसचेच आहेत.
१४ कर्णधार, १० प्रशिक्षक आणि ढिसाळ बोर्ड
वेस्ट इंडिज क्रिकेट प्रशासनातील पदाधिकाऱ्यांची संगीत खुर्ची सुरू असते. हाच खेळ संघातही पाहायला मिळतो. २००० पासून आतापर्यंत त्यांनी टेस्टमध्ये १४ कर्णधार नेमले आहेत. वनडेत १९ तर टी२० प्रकारात १७ कर्णधार नियुक्त केले आहेत. काहीजणांनी तर फक्त एखाद्या सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. ज्या संघाचा कर्णधार स्थिर नाही किंवा जो खेळाडू संघात नियमित नाही त्याच्याकडे कर्णधारपद दिलं जात असेल तर संघाची काय अवस्था असेल याचा विचारच केलेला बरा. जे कर्णधाराच्या बाबतीत तेच प्रशिक्षकांचंही. या काळात वेस्ट इंडिजने दहा प्रशिक्षकांची नियुक्ती केली. सहाजणांची अंतरिम प्रशिक्षक म्हणूनही निवड झाली आहे. फिल सिमन्स यांनी २०१९ ते २०२२ कालावधीत कार्यकाळ सांभाळला. काहींनी कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून अशी दुहेरी भूमिकाही बजावली. त्यांनाही पदावरून बाजूला केलं गेलं. याच काळात खेळाडूंनी मानधनाच्या मुद्यावरून बोर्डाशी बंड केल्याने प्रशिक्षकांची भूमिका अधिकच कठीण झाली. पदांसाठी सत्तासंघर्ष, अस्थिर प्रशासन आणि व्यवहार्य अशा धोरणाचा अभाव यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट वर्षागणिक रसातळाला गेलं. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंच्या बंडखोर संघटनेतील बेबनाव सातत्याने ऐरणीवर राहिला. प्रशासकांना क्रिकेटचा पुरेसा अनुभव नाही अशी खेळाडूंची तक्रार होती. प्रथम श्रेणी क्रिकेटला चालना देण्यासाठी काय करता येईल याबाबत कोणताही रोडमॅप नाही. खेळपट्ट्यांचा आणि एकूणातच क्रिकेटचा दर्जा सुधारावा यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसले नाहीत.
१९२७ पासून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड चॅम्पियनशिप ही वेगळीच कथा आहे. डोमेस्टिक क्रिकेटमधली स्पर्धेला कोणतंही ग्लॅमर नाही. स्पर्धेसाठी संथ खेळपट्ट्या असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून ना चांगले बॅट्समन घडतात ना बॉलर.
कोटीच्या कोटी उड्डाणे
सुनील गावस्कर यांनी ‘मिड डे’ वर्तमानपत्रातील स्तंभात लिहिल्याप्रमाणे, वेस्ट इंडिजमधली सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टम विनाशकारी आहे. सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळे ठराविक मानधनाची सोय होत असल्यामुळे खेळाची ऊर्मी कमी होत चालली आहे. मॅच फी दुप्पट किंवा तिप्पट करून किंवा ठोस कॉन्ट्रॅक्ट मनी हा विषय काढून टाकला तर खेळाडूंच्या वर्तनात बदल होईल का? १० ते १५ टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनरुपी मानधन देण्याची व्यवस्था हवी. खेळाचा दर्जा कसाही असला तरी ठरलेले पैसे मिळतात. त्यामुळे कामगिरी उंचावण्यासाठी वेगळे प्रयत्न व्हायला हवेत. गावस्करांचा अनुभव लक्षात घेता त्यांची सूचना उपयोगी ठरू शकते मात्र यामुळे काही खेळाडू टेस्ट मॅच खेळण्यापासून परावृत्त होऊ शकतात. वेस्ट इंडिजसाठी खेळणं हा अभिमान वगैरे बाजूला पडून घर चालवण्यासाठी पैसे मिळवणं एवढ्यापुरतंच पैशाचं महत्त्व उरल्याने गोष्टी संकुचित झाल्या आहेत.
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा काही दिवसांपूर्वी भारतात होता. वेस्ट इंडिजने अहमदाबाद कसोटी अवघ्या अडीच दिवसात गमावली. लाराने या पराभवानंतर शल्य व्यक्त केलं. लारा म्हणाला, ‘रॉस्टन चेस आणि अन्य मंडळींना खरंच क्रिकेटमध्ये स्वारस्य आहे का? त्यांना वेस्ट इंडिजसाठी खरंच खेळायचं आहे का’? पर्यटनकेंद्रित अर्थव्यवस्थेला रोजच भेडसावणारा प्रश्न आहे की पैसा कमवायचा कसा?
वेस्ट इंडिजसाठी खेळणारे खेळाडू जगभरातील टी२० लीगमध्ये विखुरले आहेत. नव्या जगाचा मूलमंत्र झालेल्या टी२० लीगच्या विश्वाला ते सरावले आहेत. याव्यतिरिक्त जे शिल्लक आहेत ते रोजीरोटीसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतात, पॅशन म्हणून नाही.
वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेसने याचं खापर अपुऱ्या पैशावर फोडलं. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अन्य संघ यांच्यातील कमाईत घाऊक अंतर वाढलं आहे. २०२४-२७ या कालावधीत भारताला आयसीसीच्या उत्पन्नामधला ३८.५ म्हणजेच जवळजवळ ४० टक्के हिस्सा मिळतो. याच्या तुलनेत वेस्ट इंडिजला मात्र फक्त ४.५ टक्के एवढाच पैसा मिळतो. यामागचं तत्व व्यवहार्य आहे. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या बोर्डांना कमाईतला सर्वाधिक हिस्सा मिळतो. कदाचित या संरचनेतच गडबड असावी. वसाहतवादी गुलामीचा इतिहास असणारे बेटरुपी देश आता आधुनिक जगातील वसाहतवादी बोर्डांशी लढाई करत आहेत. बाकी बोर्डांचं वर्चस्व आणि वेस्ट इंडिजची अधोगती हा निव्वळ योगायोग नाही.