कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करेन असा विश्वास भारतीय संघातून डावलण्यात आलेला अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने व्यक्त केला. इरफान पठाण गेली पाच वर्ष भारतीय कसोटी संघाचा भाग नाही.
गेल्या अनेक वर्षांत मी कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही पण ती वेगळी गोष्ट आहे. मी पुन्हा कसोटी क्रिकेट खेळू शकतो. मी स्वत:लाच आश्वासन दिले आहे. पुनरागमनाचे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेन असे इरफानने सांगितले.
२८ वर्षीय इरफानने आपल्या शानदार कामगिरीने कपिल देवच्या अष्टपैलू खेळाची आठवण करुन दिली होती. मात्र त्यानंतर दुखापती आणि खराब फॉर्ममुळे त्याला कसोटी तसेच एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आला.
मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा खेळू शकणार नाही असे अनेक लोकांनी सांगितले होते. पण मला माहिती होते की मी खेळणार आहे. मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियात २०११-१२ मध्ये झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये पुनरागमन केले.
उद्दिष्ट गाठण्याच्या विचाराने मी खेळत आहे आणि मला खात्री आहे की लवकरच संघात पुन्हा परतेन. मी माझ्या उद्दिष्टापासून भरकटलो तर निवड समितीला मला संघात जाण्यापासून रोखू शकते. नोव्हेंबर महिन्यात बडोद्यातर्फे रणजी करंडकाचा सामना खेळत असताना कर्नाटकविरुद्धच्या लढतीत इरफानच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ही दुखापत झाल्यानंतर इरफान व्यवसायिक दर्जाचे क्रिकेट खेळलेला नाही. मात्र आता मी दुखापतीतून पूर्णपणे सावरलो असून मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार असल्याचे इरफानने स्पष्ट केले. वेग ही जमेची बाजू कधीच नव्हती. चेंडू स्विंग करणे हेच माझे बलस्थान आहे. संघव्यवस्थापनाच्या निर्णयानुसार गोलंदाजी तसेच फलंदाजीतही योगदान देण्यास तयार असल्याचे इरफानने सांगितले.