Jasprit Bumrah: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली त्यावेळी दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. पहिली मोठी घोषणा म्हणजे, शुबमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर दुसरी घोषणा ही बुमराहच्या खेळण्याबाबत होती. बुमराह या मालिकेतील ५ पैकी ३ सामने खेळणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. आतापर्यंत तो मालिकेतील पहिला, तिसरा आणि चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्यामुळे त्याचे ३ सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे तो शेवटचा सामना खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जसप्रीत बुमराह पाचवा कसोटी सामना खेळणार का?
या मालिकेतील पाचवा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण, भारतीय संघ या मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. जर भारतीय संघाला ही मालिका बरोबरीत आणायची असेल, तर मालिकेतील शेवटचा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. पण जसप्रीत बुमराह हा सामना खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण जसप्रीत बुमराह या मालिकेतील ५ पैकी ३ सामने खेळणार होता. त्याचे ३ सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे ओव्हल कसोटीत तो आपला निर्णय बदलणार का? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर म्हणाला, “याबाबत सध्यातरी कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. जो कोणीही खेळणार तो देशासाठी आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार.”
यासह गौतम गंभीरने आणखी एक महत्वाची माहिती दिली आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यादरम्यान आकाशदीप आणि अर्शदीप सिंग दुखापतग्रस्त झाले होते. दुखापतीमुळे दोघेही चौथा सामना खेळू शकले नव्हते. त्यामुळे अंशुल कंबोजचा अंतिम अकरात समावेश करण्यात आला होता. मात्र, आता सर्व गोलंदाज पूर्णपणे तंदुरूस्त असल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने दिली आहे.
ओव्हल कसोटीत भारतीय संघाची प्लेइंग ११ बदलणार?
मालिकेतील चौथ्या कसोटीत सामन्यात अंशुल कंबोजला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. पण त्याला केवळ एक गडी बाद करता आला होता. त्याची ही कामगिरी पाहता त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. आकाशदीप आणि अर्शदीप सिंगही फिट झाला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात आकाशदीप पुनरागमन करू शकतो. जर जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीत खेळणार नसेल, तर अर्शदीप सिंगला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. पण महत्वाचा सामना पाहता जसप्रीत बुमराह आपला निर्णय बदलू शकतो.