लय मिळविण्यासाठी झगडणाऱ्या न्यूझीलंड संघासमोर महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात आज, शुक्रवारी बांगलादेशचे आव्हान असेल. न्यूझीलंडला सलग दोन लढतींत पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा संघ तीन सामन्यांत दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.

बांगलादेशच्या फिरकीपटूंनी आतापर्यंत चमक दाखवली आहे आणि गुवाहाटीच्या खेळपट्टीकडूनही त्यांना मदत मिळेल. बांगलादेशने सलामीच्या लढतीत पाकिस्तानला नमवले होते. त्यानंतर दुसऱ्या लढतीत त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. आता त्यांचे विजयी पुनरागमनाचे लक्ष्य असेल. फिरकी गोलंदाजी ही बांगलादेशची ताकद असून उपकर्णधार नाहिदा अख्तर, फाहिमा खातून आणि राबिया खान या न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर आव्हान उपस्थित करू शकतील.

फलंदाजी ही बांगलादेशसाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या सामन्यात शरमीन अख्तरला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठविण्यात आले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. इंग्लंडविरुद्ध बांगलादेशचा डाव १७८ धावांवर आटोपला. रूबिया हैदरने अर्धशतकी खेळी केली, पण मध्यक्रमात सातत्य दिसून आले नाही.

दुसरीकडे, न्यूझीलंडला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांतील कामगिरी उंचवावी लागणार आहे. कर्णधार सोफी डिव्हाइन वगळता न्यूझीलंडची एकही फलंदाजांना चमक दाखवू शकलेली नाही. विशेषत: अमेलिया करने अष्टपैलू योगदान देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास न्यूझीलंड संघाला स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवता येऊ शकेल. वेळ : दुपारी ३ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, जिओहॉटस्टार ॲप.