केपटाउन : महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव पचवणे अत्यंत अवघड आहे. या पराभवाला मागे सारण्यासाठी आणखी किती दिवस लागतील हे सांगणे अवघड आहे. मात्र, आम्हाला नशिबाची थोडीही साथ लाभली असती, तरी आम्ही या सामन्यात विजय मिळवला असता, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केली.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला बलाढय़ ऑस्ट्रेलियाकडून पाच धावांनी हार पत्करावी लागली. भारतीय संघ विजयाच्या दिशेने कूच करत होता. १७३ धावांचा पाठलाग करताना भारताला ३३ चेंडूंत ४१ धावांची आवश्यकता होती. मात्र, त्याच वेळी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीतची बॅट खेळपट्टीमध्ये अडकली आणि ती ५२ धावांवर धावचीत झाली. त्यानंतर सामन्याचे चित्र पालटले. तळाच्या फलंदाजांना फारसे योगदान देता न आल्याने भारताला विजयाने हुलकावणी दिली.

‘‘मला स्वत:वर आणि माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवणे खूप अवघड जाते आहे. आम्हाला हा पराभव पचवण्यासाठी आणि या पराभवाला मागे सारण्यासाठी किती दिवस लागणार हे सांगणेही अवघड आहे. परंतु, आम्ही चांगले क्रिकेट खेळलो याचे समाधान आहे,’’ असे हरमनप्रीतने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

हरमनप्रीत ज्या पद्धतीने धावचीत झाली त्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने टीका केली. हरमनप्रीतने शालेय मुलीप्रमाणे चूक केल्याचे नासिरने म्हटले. याबाबत विचारले असता हरमनप्रीत म्हणाली, ‘‘नासिर खरेच असे म्हणाले? हे त्यांचे मत आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात. फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना बॅट खेळपट्टीमध्ये अडकून तो फलंदाज धावचीत झाल्याचे आपण याआधीही पाहिले आहे. मात्र, आम्हाला नशिबाची थोडीही साथ लाभली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता. मी ज्याप्रकारे फलंदाजी करत होते ते पाहता, मी केवळ अशाच दुर्दैवी पद्धतीने बाद होऊ शकत होते.’’

अखेरच्या षटकांतील फलंदाजी निराशाजनक – जेमिमा

भारताला अखेरच्या ३० चेंडूंत विजयासाठी ३९ धावांची आवश्यकता होती. रिचा घोष, दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांसारख्या सक्षम फलंदाज असूनही भारताला विजयासाठी पाच धावा कमी पडल्या. आम्ही अखेरच्या षटकांत केलेली फलंदाजी निराशाजनक होती, असे सामन्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली. ‘‘आमचे सामन्यावर नियंत्रण होते. आम्ही प्रत्येक टप्प्यावर ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक धावा केल्या होत्या. मात्र, अखेरच्या षटकांत आमच्याकडून चुका झाल्या. हरमनप्रीत बाद झाली, तेथूनच सामना आमच्या हातून निसटला,’’ असे जेमिमाने नमूद केले.