हैदराबाद : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणारे न्यूझीलंड व नेदरलँड्स संघ सोमवारी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. न्यूझीलंडने गुरुवारी गतविजेत्या इंग्लंडवर नऊ गडी राखून विजय नोंदवत आपले इरादे स्पष्ट केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सामन्यात ९ बाद २८२ धावा केल्या. यानंतर फलंदाजीस आलेल्या न्यूझीलंडने ३६.२ षटकांत हे लक्ष्य पूर्ण केले. या सामन्यात डेव्हॉन कॉन्वे (नाबाद १५२) व रचिन रवींद्र (नाबाद १२३) यांनी आक्रमक खेळी केल्या. न्यूझीलंडने हा विजय नियमित कर्णधार केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत मिळवला.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान विल्यम्सनला झालेल्या दुखापतीमुळे तो विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना खेळू शकला नव्हता. विल्यम्सन नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यासाठीही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे संकेत न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी दिले आहेत. त्यामुळे टॉम लॅथमकडे संघाची धुरा असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या निवडीची शक्यताही कमीच आहे.
हेही वाचा >>>IND vs AUS, World Cup 2023: शानदार इनिंग खेळूनही विराट दिसला नाराज, कपाळावर मारुन घेतानाचा VIDEO व्हायरल
दुसरीकडे, नेदरलँड्सला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून ८१ धावांनी हार पत्करावी लागली. या सामन्यात ‘पॉवरप्ले’मध्ये नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचे तीन गडी बाद केले होते. तसेच, त्यांचे फलंदाज विक्रमजीत सिंग (५२) व बास डी लीडे (६७) यांनी अर्धशतकी खेळी केली होती. नेदरलँड्स संघाची गोलंदाजी चांगली असून त्यांच्या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे.
वेळ : दु. २ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)