जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा सिंधू, श्रीकांतचा विजयी प्रारंभ ; सात्त्विक-चिराग, पोनप्पा-सिक्की रेड्डी यांचा पराभव

गतविजेत्या पी. व्ही. सिंधूला आगामी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

पी. व्ही. सिंधू

बाली : आघाडीचे भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्याचा (वर्ल्ड टूर फायनल्स) विजयी प्रारंभ केला. सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडय़ांना मात्र पराभव पत्करावा लागला.

दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने अ—गटातील पहिल्या लढतीत डेन्मार्कच्या लिन ख्रिस्टोफर्सनला २१—१४, २१—१६ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. पहिल्या गेममध्ये ६—८ असे पिछाडीवर पडल्यानंतर सिंधूने सलग १० गुण मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले. मग तिने पहिला गेम २१—१४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मध्यंतराला सिंधूकडे ११—१० अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. त्यानंतर तिने आक्रमक खेळ करत हा गेम पाच गुणांच्या फरकाने जिंकला. सिंधूपुढे गुरुवारी यव्होने लिचे आव्हान असेल.

पुरुष एकेरीच्या ब-गटात जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू श्रीकांतने फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हवर २१—१४, २१—१६ अशी मात केली. बुधवारी त्याचा तीन वेळच्या माजी कनिष्ठ विश्वविजेत्या थायलंडच्या कुंलावत वितिस्रनशी होईल. तसेच जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानी असलेल्या केंटो मोमोटाने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे लक्ष्यला विजय मिळाला.

महिला दुहेरीच्या ब-गटातील पहिल्या साखळी सामन्यात अश्विनी-सिक्की रेड्डीला नामी मात्सुयामा आणि चिहारू शिडा या दुसऱ्या मानांकित जपानी जोडीकडून १४—२१, १८—२१ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्त्विक—चिरागवर किम अ‍ॅस्ट्रप आणि आंद्रेस रॅस्मसन या डेन्मार्कच्या जोडीने १६—२१, ५—२१ अशी मात केली. सात्त्विक-चिराग यांना गेल्या आठवडय़ात झालेल्या इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतरही जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्यासाठी प्रथमच पात्र ठरण्यात ही भारतीय जोडी यशस्वी ठरली.

सिंधूला पुढे चाल

व्हेल्वा (स्पेन) : गतविजेत्या पी. व्ही. सिंधूला आगामी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत तिच्यापुढे अनुक्रमे ताइ झू यिंग आणि कॅरोलिना मरिन यांचे आव्हान असू शकेल. स्पेनमध्ये १२ ते १९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या जागतिक स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका बुधवारी जाहीर करण्यात आली. सिंधूचा दुसऱ्या फेरीत स्लोव्हेनियाची मार्टिना रेपिस्का आणि इंडोनेशियाच्या रुसेल्ली हार्तवान यांच्यातील विजेत्याशी सामना होईल. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत श्रीकांतपुढे पाब्लो एबियन, तर लक्ष्य सेनपुढे मॅक्स वेसकिर्चेनचे आव्हान असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World tour finals sindhu srikanth make winning start zws