वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी भारतीय संघ दुखापतींशी झुंजत आहे. टीम इंडियाचे अनेक अनुभवी खेळाडू अनफिट आहेत. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्यानंतर आता के.एल. राहुलही डब्ल्यूटीसी विजेतेपदाच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना राहुलला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने उर्वरित आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. भारतीय संघ व्यवस्थापन राहुलच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतिम सामन्यात टीम इंडियाला राहुलची उणीव भासेल. इंग्लंडमधील शेवटच्या कसोटी मालिकेत त्याने चांगली फलंदाजी केली होती. संघासाठी सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता. राहुलने ३१५ धावा केल्या होत्या. आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगत आहोत जे राहुलऐवजी संघात सामील होऊ शकतात.

मयंक अग्रवाल

टीम इंडियाचा सलामीवीर मयंक अग्रवाल शेवटचा भारतीय संघाकडून मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मयंकची निवड झाली नाही. मयंक आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. यंदाच्या मोसमात त्याचा फॉर्म चांगला राहिला नाही. मयंकने नऊ सामन्यांत १८७ धावा केल्या आहेत. मात्र, रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या मोसमात मयंकने जबरदस्त कामगिरी केली. त्याने १३ डावात ८२.५०च्या सरासरीने ९९० धावा केल्या. यादरम्यान तीन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली.

मयंकला २१ कसोटींचा अनुभव आहे. राहुलच्या अनुपस्थितीत तो मधल्या किंवा टॉप ऑर्डरमध्ये भारतासाठी फिट होऊ शकतो. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क या ऑस्ट्रेलियन त्रिकुटाचा सामना करण्याचा अनुभव ३२ वर्षीय खेळाडूला आहे. त्याने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियात पदार्पण केले आणि दोन सामन्यांत दोनदा ७० हून अधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा सामना कसा करायचा हे मयंकला माहीत आहे. अशा परिस्थितीत तो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो.

हेही वाचा: IPL 2023: “मी त्या दोघांना…”, कोहली-गंभीर वादावर विराटने उचलले मोठे पाऊल, BCCIला केला मेल

सरफराज खान

मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खान अनेक दिवसांपासून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत आहे, मात्र आजतागायत त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवता आलेले नाही. रणजी ट्रॉफी २०२२-२३ मध्ये, सरफराजने नऊ डावात 92.६६च्या सरासरीने ५५६ धावा केल्या, ज्यात तीन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. २५ वर्षीय खेळाडू २०१९ पासून रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने १२३.३च्या सरासरीने २४६६ धावा केल्या आहेत ज्यात १० शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. सरफराजला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी निवड समितीने देण्याची वेळ आली आहे.

अभिमन्यू ईश्वरन

डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी २७ वर्षीय अभिमन्यू ईश्वरनची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. रणजी ट्रॉफी २०२२-२३ मध्ये, बंगालच्या फलंदाजाने १४ डावात ६६.५०च्या सरासरीने ७९८ धावा केल्या, ज्यात तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. ईश्वरन दीर्घकाळापासून निवड समितीच्या रडारवर आहे. रणजी ट्रॉफीमधील त्याच्या चमकदार कामगिरीमुळे संघात पुन्हा निवड होण्याची शक्यता वाढली आहे.

सूर्यकुमार यादव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. त्याला कसोटीत खेळण्याची संधीही मिळाली, पण तो आपली छाप पाडू शकला नाही. सूर्यकुमारला केवळ आठ धावा करता आल्या. यानंतर तो एकदिवसीय मालिकेतही त्याचा खराब फॉर्म सुरूच होता. मात्र, त्याला आयपीएलमध्ये आपली लय सापडली आहे. ओव्हलवर होणार्‍या अंतिम फेरीत सूर्यकुमार मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करून संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत करू शकतो.

हेही वाचा: IPL2023: सगळ्यांचे लक्ष आयपीएलवर मात्र, एकटा पुजारा कौंटी गाजवतोय, ससेक्ससाठी चार सामन्यांत ठोकले तिसरे शतक

इशान किशन

वेगवान फलंदाजी आणि एक बाजू भक्कम सांभाळून ठेवण्याच्या क्षमतेमुळे राहुलच्या जागी इशान किशनची निवड होऊ शकते. टीम इंडियाकडे सध्या एकच विकेटकीपर के.एस. भरत आहे. राहुल कीपिंगही करतो, पण तो सध्या संघात नाही. अशा परिस्थितीत इशानची अतिरिक्त विकेटकीपर फलंदाज म्हणून निवड केली जाऊ शकते. किशनला प्रथम श्रेणी क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने ४८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३८.७६च्या सरासरीने २९८५ धावा केल्या आहेत. किशनने अजून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली होती, मात्र तो प्लेइंग-११ मध्ये सहभागी होऊ शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final who will replace kl rahul in team india sarfaraz ishan kishan including these five players in the race avw
First published on: 06-05-2023 at 20:25 IST