Yash Dayal apologizing for Love Jihad Insta story: गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयाल सोमवारी सकाळी अचानक सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. याचे कारण यश दयालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेली एक स्टोरी आहे. दिल्लीतील साक्षी हत्याकांडानंतर यश दयालने त्याच्या इन्स्टाग्रामवर लव्ह जिहादविषयी एक स्टोरी शेअर केली होती, ज्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. दयालने याबद्दल माफी मागितली आणि आपण सर्व धर्मांचा आदर करतो असे सांगितले.
यश दयालची इन्स्टा स्टोरी –
यश दयालने सोमवारी सकाळी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये एक मुलगा डोक्यावर पांढरी गोल टोपी घातलेला आहे आणि हातात चाकू घेऊन गुडघ्यावर बसलेला आहे. त्याने डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलीचा हात धरला आहे. जवळच एका मुलीचा मृतदेह आहे ज्यावर साक्षी असे लिहिले आहे. आजूबाजूला आणखी अनेक कबरी आहेत ज्यावर हिंदू मुलींची नावे लिहिली आहेत.
चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल –
या स्टोरीमुळे दयालला खूप ट्रोल करण्यात आले होते. चाहत्यांनी त्याला असा द्वेष पसरवण्यास मनाई केली. तसेच गुजरात टायटन्समध्ये मोहम्मद शमी आणि राशिद खानसोबत खेळताना तो अशा गोष्टी कशा करू शकतो, असे लोक म्हणाले. कुणी दयालला मुस्लिमविरोधी तर कुणी संघी म्हणत आहेत. यानंतर यश दयालला त्याची चूक लगेच लक्षात आली आणि त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीबद्दल माफी मागितली.
यश दयालने मागितली माफी –
त्यानंतर दयालने माफी मागताना सांगितले की, त्याच्याकडून ते चुकून झाले. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना त्याने लिहिले की, ‘मित्रांनो, मी माझ्या स्टोरीबद्दल माफी मागतो, मी ती चुकून पोस्ट केली. कृपया द्वेष पसरवू नका. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो.” मात्र तरीही चाहते या गोलंदाजाला ट्रोल करत आहेत.