आज म्हणजेच १५ जून रोजी सगळीकडे फादर्स डे साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रटी, क्रिकेटपटू सर्वच जण आपल्या वडिलांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याचदरम्यान भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे हिने त्यांच्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला आहे. फादर्स डे निमित्त झहीरबरोबर त्याचा फोटो शेअर केला आहे.

झहीर खान आणि मराठी अभिनेत्री सागरिका घाटगे लग्नानंतर ७ वर्षांनी आई-बाबा झाले. चिमुकल्यासह फोटो शेअर करत सागरिकाने मुलाचं नाव देखील जाहीर केलं आहे. सागरिकाने १६ एप्रिल रोजी त्यांच्या लेकाचा जन्म झाल्याची माहिती पोस्ट शेअर करत दिली. या दोघांनी त्यांच्या लेकाचं नाव फत्तेसिंग खान असं ठेवलं आहे.

सागरिकाने आता आज फादर्स डे निमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने पहिल्यांदाच आपल्या लेकाचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. या फोटोमध्ये त्यांचा लेक फत्तेसिंग आणि झहीर खान एकमेकांकडे हसत पाहत आहेत. सागरिकाने या गोड फोटोला भलंमोठं कॅप्शन लिहिलं आहे.

सागरिकाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, “मी सहसा कधी कॅप्शन वगैरे लिहित नाही पण मी आज लिहितेय. कारण, कधीतरी आमचा लेक ही पोस्ट वाचणार आहे आणि त्यालाही हे कळलं पाहिजे की तू त्याचा बाबा आहेस म्हणून तो खरंच खूप नशीबवान आहे. सर्वांसाठी तुझ्या मनात असलेलं प्रेम, ज्याप्रमाणे तू सर्वांची काळजी घेतोस, तुझा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन, धैर्य आणि बरंच काही… जर तो मोठा होऊन थोडासा का होईना तुझ्यासारखा बनला तर तो खरोखरच एक खास व्यक्ती बनेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सागरिकाने पुढे म्हटलं, “प्रत्येक वळणावर तुला भेटणाऱ्या प्रत्येकाची जशी काळजी घेतोस, कठिण प्रसंगातही ज्याप्रकारे तू शांत आणि स्थिर राहतोस, शांत राहूनही हजारो शब्द बोलण्याची तुझी ताकद… या सर्व गोष्टी दाखवतात की तू एक व्यक्ती म्हणून किती कमाल आहेस. आपल्या मुलाकडे तू एक कमालीचं उदाहरण म्हणून त्याच्यासमोर आहेस. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.” असं म्हणत सागरिकाने पुढे झहीर खानला टॅग केलं आहे.