न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील गतउपविजेत्या कॅस्पर रूडला यावेळी दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या झँग झिझेनने ऐतिहासिक विजय नोंदवताना पाचव्या मानांकित रूडला ६-४, ५-७, ६-२, ०-६, ६-२ असे पराभूत केले. ‘एटीपी’ क्रमवारीत अव्वल पाचमध्ये असलेल्या खेळाडूला नमवणारा झँग हा चीनचा पहिला खेळाडू ठरला आहे. पुढील फेरीत झँगचा सामना ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिजिकाटाशी होणार आहे.
झँगने जूनमध्ये झालेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतही तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला होता. तर रूडने गेल्या सहा ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी तीनमध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळेच झँगची ही कामगिरी उल्लेखनीय ठरते आहे.
हेही वाचा >>> Sunil Chettri: गुड न्यूज! फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन, पत्नी सोनमने दिला मुलाला जन्म
सातव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासलाही पराभवाचा सामना करावा लागला. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या स्वित्झर्लंडच्या डॉमिनिक स्टिकरने त्सित्सिपासला ७-५, ६-७, ६-७, ७-६, ६-३ असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित नोवाक जोकोविचने मात्र विजयी घोडदौड कायम राखली. जोकोव्हिचने ७६व्या मानांकित स्पेनच्या बर्नाबे जापाटा मिरालेसवर ६-४, ६-१, ६-१ असा विजय नोंदवला.
महिलांमध्ये अग्रमानांकित व गतविजेत्या पोलंडच्या इगा श्वीऑनटेकने ऑस्ट्रेलियाच्या दारिया साविलेला ६-३, ६-४ असे पराभूत केले. तर, २००९मध्ये उपविजेती राहिलेल्या कॅरोलिन वॉझनियाकीने दोन विम्बल्डन विजेता पेट्रा क्विटोवावर ७-५, ७-६ असा विजय साकारला. त्यापूर्वी, अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफने रशियाच्या १६ वर्षीय मीरा आंद्रीव्हाला ६-३, ६-२ असे नमवत पुढील फेरी गाठली. तर, दहाव्या मानांकित कॅरोलिना मुचोव्हाने पोलंडच्या मॅग्दालीना फ्रेचला ६-३, ६-३ असे नमवले.