सुधा सोमणी
मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग
(भाग २)
मागील लेखात आपण तरफ आणि कप्पी यांविषयी माहिती करून घेतली. या लेखात उतरण, स्क्रू, पाचर, चाक आणि धुरा यांविषयी जाणून घेऊ या.
आपल्या घरी पाहुणे आले आहेत. त्यातील एक व्यक्ती वयामुळे किंवा तत्सम कारणांमुळे चाकांची खुर्ची (व्हीलचेअर) वापरीत आहे. घरात प्रवेश करण्यासाठी तीन-चार पायऱ्या आहेत. ती व्यक्ती स्वत:हून त्या चार पायऱ्या चढू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून आपण चटकन एखादी लाकडी फळी आणून त्या पायऱ्यांवर तिरपी ठेवतो. आता ती खुर्ची त्या तिरप्या फळीवरून ढकलून अगदी कुणीही सहज आत आणू शकते. अशी ही तिरपी ठेवलेली फळी म्हणजे उतरण. उतरणवरून त्या व्यक्तीसह खुर्ची ढकलताना त्या व्यक्तीचे वजन कमी झाले नाही. ज्या उंचीतून ती खुर्ची उचलली, तेही कमी झाले नाही. केलेले कार्यही कमी झाले नाही. केवळ त्या कार्यासाठी लागणारे बल कमी झाले. जितका त्या फळीचा तिरपेपणा कमी (जमिनीशी केलेला कोन कमी) त्याच प्रमाणात वापरावयास लागणारे बल कमी होते. बल कमी करून ती खुर्ची अधिक अंतर कापते. जास्त अंतर कापणे ही अडचण नसून जास्त बल (व्यक्ती अधिक खुर्ची) ही आपली खरी अडचण असते.
अशी ही उतरण आपल्या ध्यानीमनी नसताना आपण अनेक ठिकाणी वापरतो. स्क्रू हेदेखील उतरणचे उदाहरण आहे. पडला ना प्रश्न कसे काय? स्क्रू म्हणजे एका दंडगोलाकार (सिलेंडर) भोवती गुंडाळलेली उतरण. उतरण दंडगोलाकारभोवती गुंडाळून आटे (थ्रेडस्) तयार होतात. कमी बल वापरून दोन गोष्टी जोडण्याचे कार्य स्क्रू करतो. प्रेशर कुकर, फ्राइंग पॅन या सर्वासाठी असलेली मूठ स्क्रूच्या साहाय्याने जोडलेली असते. खुच्र्या, टेबलांच्या फळ्या, पाय जोडण्यासाठी स्क्रूचा वापर होतो. सध्या तर भिंतीवरील स्मार्ट टी.व्ही.सुद्धा स्क्रूच्या साहाय्याने लावले जातात. स्क्रूला आटे असतातच, शिवाय धारदार टोकही असते. धारदार टोक किंवा बाजू बनविण्यासाठीही उतरणचा वापर केला जातो. उदा. कात्री, सुरी, काटा आणि खिळा. दोन उतरण त्या दोघांमध्ये छोटा कोन ठेवून जोडले असता त्यांच्या जोडणीपाशी धारदार बाजू तयार होते. कात्रीच्या दोन पाती तसेच सुरीमध्येही अशाच प्रकारे धारदार बाजू तयार करतात. जोडलेल्या दोन उतरणमधील कोन जितका लहान तितकेच कापायला अथवा चिरायला लागणारे बल कमी. अशा पद्धतीने कमी बल प्रयुक्त करावा लागतो. पण कोन कमी केला की त्याचा परिणाम म्हणून कामाचा वेगही कमी होतो.
लाकूड कापणे अथवा ओंडका चिरणे हे काम सोपे नाही. त्यासाठी दोन उतरण जोडताना त्यांच्यामधील कोन हा मोठा ठेवतात. हा कोन मोठा ठेवल्याने वापरण्यात येणारे बल जास्त असावे लागते. मोठा कोन घेण्याचा फायदा म्हणजे लाकूड कापण्याचा वेग वाढतो. अशा प्रकारे कोन वाढवून जरी बल जास्त वापरावयास लागत असेल तरी कामाचा वेग वाढवला जातो. अशा प्रकारे तयार झालेले साधे यंत्र म्हणजे पाचर. लाकडाचा मोठा ओंडका तोडताना या पाचराचा उपयोग केला जातो. त्यामुळे तो ओंडका सहज आणि कमी श्रमात तोडणे शक्य होते. अशी ही पाचर लांब दांडय़ाला जोडून कुऱ्हाड तयार करतात.
सहाव्या प्रकारचे साधे यंत्र म्हणजे चाक आणि धुरा. चाक आणि धुरा यांच्या रचनेत चाकाचा व्यास हा धुरेच्या व्यासापेक्षा अधिक असतो. त्याच्या व्यासाच्या गुणोत्तराच्या पटीत चाकावर प्रयुक्त केलेल्या बलाचे विशालन होऊन ते बल धुरेला हस्तांतरित होते. हल्ली दार उघडण्यासाठी असलेली जी गोल मूठ असते, तिथे चाक आणि धुरा या तत्त्वाचा वापर केला जातो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 12:09 am