डॉ. संगीता पेडणेकर
मधुमेह पूर्णपणे बरा होत नसला तरी त्याला नियंत्रणात आणून सामान्य जीवन जगता येते. या आजाराबाबत अनेक समज-गैरसमज असून योग्य माहिती समजून घेतली तर त्यावर नियंत्रण मिळविणे फार अवघड नाही.
मला कोणताही त्रास होत नाही. मला औषधांची गरज काय? असे म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. मधुमेहाच्या जवळजवळ ५० टक्के लोकांना कोणतीही शारीरिक लक्षणे दिसून येत नाहीत. अचानक एखाद्या वेळी हृदयविकार, लकवा, मूत्रपिंड निकामी होणे, अंधत्व हे आजार निदर्शनास आल्यावर मधुमेह असल्याचे समोर येते. त्यामुळे बऱ्याचदा लक्षणे नसली तरी चाळिशीच्या वरील व्यक्तींनी सहा महिन्यांतून एकदा मधुमेहाची तपासणी करणे गरजेचे आहे.
निरोगी व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी ८० मिलिग्रॅम प्रति १०० मिलिलिटर असते. मधुमेह व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढलेले म्हणजे सुमारे १२० मिलिग्रॅम प्रति १०० मिलिलिटरपेक्षा अधिक असते.
लक्षणे- दिवसाकाठी वारंवार लघवीला होणे, तहान लागणे आणि भूक वाढणे ही रक्तातील ग्लुकोज वाढल्याची काही लक्षणे आहेत. दीर्घकाळ मधुमेह असल्यास धूसर दिसणे, हातापायांना मुंग्या येणे आणि जखमा लवकर भरून न येणे अशी लक्षणेही दिसतात.
इन्सुलिनचे महत्त्व- इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडातील बीटा पेशींमध्ये तयार होते आणि ते रक्तात मिसळते. शरीराला लागणाऱ्या ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे कबरेदके. खाल्लेल्या अन्नातील कबरेदकाचे पचन लहान आतडय़ात होऊन त्याचे रूपांतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये होते. इन्सुलिनमुळे पेशींना ग्लुकोज मिळते. इन्सुलिन कमी पडल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन ते यकृतात साठविण्याची क्रिया इन्सुलिनमुळे होत असते. तसेच यकृतात इन्सुलिनच्या उपस्थितीत काही प्रथिनांची निर्मिती घडून येत असते. इन्सुलिन कमी पडल्यास या सर्व क्रिया मंदावतात.
समज व गैरसमज
मधुमेहाचे निदान झाल्यावर अनेक लोकांचे सल्ले येऊ लागतात आणि नवमधुमेही गोंधळून जातात. एकाच वेळी देशी, आयुर्वेदिक इतर पॅथीची औषधे चालू असतात. तर कधी अॅलोपॅथीची औषधे थोडे दिवस घेतल्यानंतर बंद केली जातात.
१. मधुमेह हा गंभीर आजार नाही, परंतु त्याचे परिणाम गंभीर असतात.
२.गोड खाल्ल्याने मधुमेह होतो असा समज आहे. निरोगी व्यक्तीने गोड खाल्ल्यावर त्याच्या रक्तातील साखर वाढत नाही किंवा त्यांना मधुमेह होत नाही. परंतु मधुमेही व्यक्तीने साखर खाल्ली तर वाढते.
३.मधुमेहाच्या गोळ्या व इन्सुलिन घेत असल्यास गोड खाल्ले तरी चालते असाही गैरसमज असतो. मधुमेह नियंत्रणासाठी उपचारासह आहारावर निर्बंध ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे गोळ्या किंवा इन्सुलिन घेतल्यानंतरही आहाराची पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
४.मधुमेहींनी खास मधुमेहींसाठीचे अन्नपदार्थ खाणे गरजेचे आहे का अशीही विचारणा अनेकदा रुग्ण करतात. मधुमेहींसाठी असा खास आहार नसतो. सध्या बाजारात ‘शुगर फ्री’ या नावाखाली मिठाई, बिस्किटांसह अनेक पदार्थाची विक्री केली जाते. त्यामुळे हे पदार्थ कितीही खाल्ले तर चालेल असा भ्रमही मधुमेहींमध्ये असतो. घरातील सकस आहार हाच मधुमेहींचा आहार आहे.
५.साखरेऐवजी गूळ किंवा मध खाल्ला तर चालतो, असाही एक गैरसमज आहे. उष्मांकाच्या तुलनेत गूळ, मध आणि साखर यामध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे गूळ किंवा मध हे साखरेला पर्याय नाहीत.
६.इन्सुलिनपेक्षा गोळ्या चांगल्या अशीही समजूत मधुमेहींमध्ये असते. ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार’, या म्हणीप्रमाणे इन्सुलिनचा नैसर्गिक स्रोत संपल्यावर गोळ्या उपयुक्त नाहीत. बऱ्याचदा शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले तरी शरीरावर परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळेही ती नियंत्रणात आणण्याचे महत्त्व रुग्णांच्या लक्षात येत नाही. लोखंडाला ज्याप्रमाणे हळूहळू गंज चढतो, त्याप्रमाणे शरीरातील अतिरिक्त साखर अवयवांवर परिणाम करत असते.
७.इन्सुलिन घेतल्यावर शरीराला सवय लागते का असाही प्रश्न अनेकदा विचारला जातो. स्वादुपिंडामध्ये इन्सुलिनची निर्मिती कमी होते तेव्हा मधुमेह आटोक्यात ठेवणे अवघड होते. नैसर्गिकरीत्या शरीरात तयार होणाऱ्या इन्सुलिनची गरज इंजेक्शनने भागविली जाते. इन्सुलिन हे सर्वात भरवशाचे औषध आहे आणि याची सवय लागते हा चुकीचा समज आहे.
बदललेली जीवनशैली अवलंबून आणि योग्य प्रकारे आहार-विहार-विचार आणि उपचार आत्मसात करून मधुमेह आटोक्यात ठेवता येतो आणि जीवन आरोग्यदायी व सुखकर करणे शक्य आहे.
मधुमेह नियंत्रणासाठी हे लक्षात ठेवा
’ साखरेची तपासणी नियमितपणे करावी
’ मधुमेहासह रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलचा त्रास असल्यास याचीही औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे.
’ जेवणाच्या वेळा नियमित ठेवा.
’ बाहेरील शरीराला हानीकारक पदार्थ शक्यतो टाळावेत आणि मोजकेच खावे. तेलकट पदार्थ कमीत कमी खावेत.
’ कमीत कमी ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करावा.
’ पायांची निगा राखावी.
’ दर तीन महिन्यांतून एकदा एचबी आणि ए १ सी तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
’ मधुमेह हा आयुष्यभराचा सोबती आहे. तो पूर्णपणे बरा होत नसला तरी निर्धारपूर्वक आहार, व्यायाम आणि औषधे यांचे पालन केले तर जीवनाचा आस्वाद घेणे सहज शक्य आहे.
मधुमेहाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
’ सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे विकार
’ मूत्रिपड, डोळ्यांचे, मज्जातंतूचे विकार
’ मोठय़ा रक्तवाहिन्यांचे विकार
’ हृदयविकार, पक्षाघात, पायांचे विकार