डॉ. अविनाश भोंडवे : ‘हर्निया’ म्हणजे शरीराच्या रचनेत दोष निर्माण झाल्यामुळे होणारा एक विकार. सायकलचा टायर जुना झाल्यावर त्याला चीर पडते आणि त्यातून आतील टय़ूबचा फुगा बाहेर येतो, असाच काहीसा प्रकार आपल्या शरीरात घडून हर्निया निर्माण होतो. मानवी शरीरात पोटाच्या बाह्य़भागावरील स्नायू काही ठिकाणी जोडले गेलेले असतात. काही कारणांमुळे हा जोड सैल पडतो आणि हे स्नायू मध्येच विलग होतात. विलग झालेल्या या भागातून पोटाच्या आतील आतडय़ाला जोडणारी अंतर्गत आवरणे (ओमेंटम) स्नायूंच्या पदरातून फुगवटय़ाच्या स्वरूपात बाहेर डोकावू लागतात, यालाच हर्निया म्हणतात.

* कारणे : स्थूलत्व , दीर्घकाळ खोकला, सततच्या शिंका, शौचाला कुंथण्याची सवय, सतत जड वजन उचलण्याची कामे करणे, पोटावरील शस्त्रक्रिया, गर्भावस्था, वृद्धत्वामुळे पोटातील किंवा जांघेतील स्नायू शिथिल होणे.

विविध प्रकार

* इंग्वायनल हर्निया – जांघेच्या बरोबर मध्यभागी, शरीराच्या आत, एक लंबवर्तुळाकार पोकळ नलिकेसारखा भाग असतो. याला ‘इंग्वायनल कॅनॉल’ म्हणतात. पुरुषांमध्ये त्यातून वृषणात निर्माण होणारे शुक्राणू वाहून नेणारी वीर्यनलिका आणि वृषणाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाला आधार देणारे गोलाकार अस्थिबंधन (राऊंड लिगामेंट) असते. जांघेतील स्नायू शिथिल होऊन आतील चरबी किंवा आतडय़ांवरील आवरण फुग्याच्या स्वरूपात, जननेंद्रियांच्या वरील बाजूस बाहेर आलेले दिसते. हर्नियाच्या ७५ टक्के रुग्णांत हा प्रकार आढळतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याची संख्या अधिक असते.

* फीमोरल हर्निया – मांडीच्या मध्यभागी असलेल्या पोकळ भागातून आतील बाजूने चरबीचे किंवा आतडय़ांचे आवरण फुगवटा धारण करून बाहेर येते. हा हर्निया वृद्ध स्त्रियांमध्ये अधिकतर आढळतो.

* अम्बिलिकल हर्निया-  बेंबीच्या बाजूने बेंबी व्यापून टाकणारा फुगा येतो. यातही चरबीचे थर किंवा आतडय़ाचे आवरण बाहेर फुग्याच्या रूपाने येते. नवजात अर्भकांमध्ये ३ ते १० टक्के हा प्रकार आढळतो. त्यातील २० टक्के हर्निया बाळ पाच वर्षांचे होईपर्यंत आपोआप बरे होतात.

* इन्सिजनल हर्निया- पोटावरील शस्त्रक्रियेत घेतलेला छेद, शस्त्रक्रिया संपवताना टाक्यांनी शिवला जातो. काही कारणांनी टाके टाकून जोडलेले हे स्नायू कालांतराने विलग होतात आणि हा हर्निया निर्माण होतो. एकुणात दोन टक्के रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो.

* एपिगॅस्ट्रिक हर्निया- छातीचे खंजिरी हाड जिथे संपते आणि पोट जिथे सुरू होते, त्या भागात मध्यभागी हा हर्निया देऊन येतो.

* हाअ‍ॅटस हर्निया-घशाखालील भागातून सुरू होणारी अन्ननलिका छातीतून पोटात जाते. पोट आणि छाती यांना विलग करणाऱ्या श्वासपटल या मांसल पडद्याला मध्यभागी असणाऱ्या एका छिद्रातून (हाअ‍ॅटस) ती जाते. अन्ननलिकेच्या नंतर जठराची सुरुवात होते. काही रुग्णांत जठराचा सुरुवातीचा भाग हा त्या छिद्रातून उलटा छातीत जातो. याला हाअ‍ॅटस हर्निया म्हणतात.

* डायफ्रॅमॅटिक हर्निया- यात श्वासपटलाच्या छिद्रातून पोटातील अवयव छातीच्या पोकळीत शिरतात.

*   गुंतागुंत- हर्नियाच्या आतील आतडय़ाची आवरणे गुंतत जाऊन त्यात आतडी अडकू शकतात. अशा वेळेस आतडय़ाला पीळ पडून त्याची हालचाल बंद होते. आतडे निर्जीव होऊन तिथे गँगरीन होऊ  शकते. हर्नियाच्या जागेचा फुगवटा एकदम वाढणे, खूप दुखणे, हर्नियावरील त्वचा गरम होणे, पोट फुगू लागणे, उलटय़ा होणे अशी लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवक्षित जागी फुगवटा येणे, खोकल्यास किंवा वजन उचलल्यास त्या फुग्याचा आकार वाढणे, हलक्या स्वरूपाच्या आणि पोटात ओढ लागल्यासारख्या वेदना होणे अशी लक्षणे दिसतात. हर्निया हाताने किंवा स्टेथोस्कोपने तपासल्यावर आतडय़ाची हालचाल तसेच आवाज समजतात. हाताने आत ढकलल्यावर तो आत जातो आणि हात काढून जोर लावला तर परत बाहेर येतो. हळूहळू त्याचा आकार वाढत जातो.