महेश सरलष्कर mahesh.sarlashkar@expressindia.com

भाजपचे कट्टर मतदार पक्षाला मते देतीलच, पण कुंपणावरील मतदारांच्या झोळीत नरेंद्र मोदींच्या प्रतिमेहून अधिक काय दिले जाते, यावर आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे यश अवलंबून असेल. मात्र, सध्या तरी ‘व्यवस्था’ स्वत:ची प्रतिमा जपताना दिसत आहे..

caa in assam,
सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
cross voting in Rajya Sabha elections
राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला उधाण? आता निकालाकडे सर्वांचे लक्ष!
pimpri chinchwad marathi news, ncp both factions aggressive in pimpri chinchwad marathi news, rohit pawar sunil tatkare marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक

पश्चिम बंगालच्या मतदारांकडून भाजपला मोठी आशा होती. तिथल्या बुद्धिवाद्यांना आपलेसे करण्यासाठी कुठून कुठून भाजपच्या ‘बुद्धिवान’ नेत्यांना पाठवले गेले होते. काही बुद्धिवान मंडळींना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. ते पराभूत झाले. त्यांची वर्णी पुन्हा राज्यसभेत लावून दिली आहे. युक्तिवादाच्या जिवावर पक्षाला सांभाळून घेणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातत्याने स्तुती करणे एवढेच या नेत्यांचे प्रामुख्याने काम असते. त्यांना नेमून दिलेले काम ते नियमित करत असतात; पण त्यांचा पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही फायदा झाला नाही. इथला भाजपचा पराभव हा मोदींच्या नेतृत्वाची हार होती, असे भाजपचे विरोधक म्हणतात. पश्चिम बंगालमधील मुस्लीम मतदारांनी तृणमूल काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे भाजप पराभूत झाल्याचे सांगितले जात असले तरी, तिथल्या ७० टक्के हिंदूंनीही भाजपला अव्हेरले. त्यांनी गुरुवर्य रवीन्द्रनाथ टागोरांच्या ‘प्रतिमे’तील मोदींना मत दिले नाही. पश्चिम बंगालने मोदींचे नेतृत्व नाकारले, तर करोनाच्या दुसऱ्या लाटेने मोदींच्या नेतृत्वक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. या दोन्ही धक्क्यांतून स्वत:ला सावरत मोदींनी लोकाभिमुख आणि कल्याणकारी अशी स्वत:ची प्रतिमा उभी करण्याचे प्रयत्न आता नव्याने सुरू केले आहेत, असे दिसते.

पंतप्रधान मोदी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत नसले तरी, गेली सात वर्षे ते सतत लोकांच्या समोर राहिलेले आहेत. देशभर ते दौरे करत असत, सभा-समारंभांत सहभागी होत असत. एकदा तर ते भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेलाही उपस्थित राहिले होते. मोदी नेहमी धक्कातंत्राचा वापर करतात. पत्रकार परिषदेला येऊन त्यांनी थेट पत्रकारांना धक्का दिला होता. करोनामुळे मोदींचे देशभर तसेच परदेशी दौरे थांबले, पण ते दूरचित्रवाणी वाहिन्या वा समाजमाध्यमांतून लोकांशी संवाद साधतात. पहिल्या लाटेत लोकांनी मोदींचे सगळे म्हणणे ऐकले. थाळ्या वाजवल्या. टाळेबंदी स्वीकारली. आर्थिक नुकसान सहन करून देशासाठी त्याग केला. आपत्तीच्या काळात धीरोदात्तपणे देशाचे नेतृत्व करणारा नेता अशी प्रतिमा लोकांच्या समोर निर्माण झाली. करोनाच्या दुसऱ्या लाटेने या प्रतिमेला तडा गेला, असे परदेशी प्रसारमाध्यमे म्हणतात. मोदींनीही काही काळ लोकांसमोर येण्याचे टाळले होते. पण आता ते पूर्वीसारखा ‘प्रभाव’ टाकण्यासाठी जनमानसासमोर येऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांच्या चर्चेत ते अचानक सहभागी झाले. विद्यार्थ्यांचीच नव्हे, तर पालकांचीही त्यांनी विचारपूस केली. मोदी अचानक सहभागी होतील हे प्रसारमाध्यमांना आधीच माहिती होते, हा भाग वेगळा! देशातील मध्यमवर्गाने मोदी आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवून दिले आहे. नि:स्वार्थी आणि राष्ट्रवादी ही त्यांच्या मनातील आपली प्रतिमा कायम आहे का, याची चाचपणी मोदींनी विद्यार्थ्यांच्या परिसंवादात सहभागी होऊन केली असे दिसते. पालकांनी त्यांना अपेक्षित उत्तर देऊ केले, त्यामुळे मोदी संतुष्ट झालेले दिसले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून आनंद झाला, असे ते जाता जाता म्हणाले.

मोदींनी ‘सीबीएसई’च्या परीक्षांचा निर्णयही एकहाती घेऊन टाकला. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल-निशंक आजारी पडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे मोदींच्या निर्णयप्रक्रियेत शिक्षणमंत्र्यांना सहभागी होता आले नाही. पण शिक्षणमंत्रीच नव्हे, तर भाजपचे अन्य नेतेदेखील ‘परीक्षा झालीच पाहिजे’ या मतावर ठाम होते. पोखरियाल यांनी तर इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहून परीक्षांचे समर्थन केले होते. महाराष्ट्रातसुद्धा भाजपच्या नेत्यांनी परीक्षा रद्द करण्याला विरोध दर्शवला होता. पण मोदींनी भाजपच्या नेत्यांचे वा मंत्र्यांचे म्हणणे बाजूला ठेवत ‘सीबीएसई’ची बारावीची परीक्षा रद्द केली आणि मध्यमवर्गीय पालकांना-विद्यार्थ्यांना खूश करून टाकले. मोदींच्या निर्णयावर मंत्र्यांचे वा नेत्यांचे आता काही म्हणणे नसावे! केंद्रीय मंत्रिमंडळ असले तरी मोदी स्वत: सर्व निर्णय घेतात, असे म्हटले जाते. ‘सीबीएसई’च्या परीक्षेसंदर्भात मोदींनी बैठक बोलावल्याचे कळताच परीक्षा रद्द होणार हे चाणाक्ष लोकांनी लगेच ओळखले. या निर्णयाचे सगळे श्रेयही त्यांनी मोदींना देऊन टाकले. ते अशाच पद्धतीने अचानक निर्णय घेत असल्याने मोदी म्हणजे धाडसी नेता अशी प्रतिमा तयार झाली आहे. त्याच प्रतिमेमुळे भाजपचे नेते नेहमी मोदींची स्तुती करताना दिसतात. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाताळणीवरून विरोधकांनी मोदींना लक्ष्य केले असले तरी, मोदींच्या मार्गदर्शनाखाली कमीत कमी वेळात लाट आटोक्यात आली, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाहीरपणे म्हणाले. मोदींच्या नेतृत्वगुणांचे शहांनी खूप कौतुक केले. त्यातून मोदी म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच मोदी अशी एकचालकानुवर्तित प्रतिमा जणू उभी राहिली.

दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर दिल्लीत दीनदयाळ उपाध्याय मार्गावर असलेल्या भाजपच्या मुख्यालयात मोदींचे ऐतिहासिक भाषण झाले होते. ते म्हणाले होते, ‘भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कोणा घराण्याच्या मालकीचा नाही.’ गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाला खासगी संपत्ती बनवून टाकली, असा आरोप भाजपकडून सातत्याने केला जातो. पण भाजप ही कोणाची खासगी मालमत्ता कधीही होणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला मोदींनी या भाषणात दिला होता. काँग्रेसमध्ये यशाचे सगळे श्रेय गांधी कुटुंबाला दिले जाते, अपयशाची जबाबदारी कार्यकर्त्यांची असते. तसे आता भाजपमध्येही दिसू लागले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील पराभवाला मोदींना जबाबदार धरले गेले नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेतील शासन-प्रशासनाच्या अपयशाची जबाबदारीही पंतप्रधान म्हणून मोदींची नाही तर ती ‘व्यवस्थे’ची मानली गेली. पण आता करोनाची लाट ओसरू लागल्यावर मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले जात आहे. पूर्वी तत्कालीन काँग्रेस नेते देवकांत बरुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ अशी अनुनयाची भाषा केली होती, त्याची आठवण कदाचित शहांच्या विधानानंतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची बाणेदार नेत्याची प्रतिमा काँग्रेस नेत्यांनी मनोभावे जपली. त्याचे साधर्म्य कोणाला मोदींच्या मंत्री-नेत्यांच्या भाषेत आणि वागणुकीत दिसू शकेल. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींच्या अनेक प्रतिमा जनमानसात निर्माण झाल्या. लोहपुरुष, मग विकासपुरुष, पंतप्रधान झाल्यावर कठोर निर्णयक्षम नेते, तर आता त्यांची प्रतिमा ‘संतपुरुष’ अशी होऊ लागली आहे. वयानुसार शुभ्र केस, वाढलेली दाढी, अधिकारवाणीने बोलणे यांमुळे आता ते लोकनियुक्त नेत्याच्याही पलीकडे एक समर्थ व्यक्तिमत्त्व झाल्याचे लोकांना भासू लागले आहेत. एखाद्या अतिउत्साही विद्यार्थ्यांच्या बोलण्यामुळे त्यांचा अहं दुखावला जाऊ शकतो. पण हा भाग वेगळा.

काँग्रेसच्या नेत्यांनी नेतृत्वाचा अनुनय केल्याने त्यांची लोकांमधील प्रतिमा तात्पुरती उंचावली असू शकते; पण पक्ष कमकुवत होत गेला. आत्ता भाजपचे नेते मोदींची प्रतिमाही अशीच जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काँग्रेस हा विसविशीत पक्ष आहे. तिथे अमिरदर सिंग यांच्याविरोधात नवज्योत सिद्धू बंडखोरी करू शकतात. अशी ‘बेशिस्त’ भाजपमध्ये नाही. त्यामुळे प्रतिमापूजनाचा हा प्रयत्न पक्षासाठी अधिक घातक ठरण्याची शक्यता असेल. केंद्रातील नेतृत्वाची प्रतिमा टिकवण्याची धडपड फक्त भाजपच्या कट्टर समर्थकांसाठी सीमित राहिली, तर पक्षाला त्याचा फायदा होण्याची शक्यता कमी असेल. भाजपचे कट्टर मतदार पक्षाला नेहमीच मते देत राहतील. काँग्रेसचे कट्टर समर्थक त्यांना आत्ताही मते देतात. पण कुंपणावर बसलेल्या मतदारांनी सलग दोन वेळा मोदींच्या प्रतिमेकडे पाहून मते दिली. या मतदारांना मोदींची प्रतिमा न भावल्यास मात्र पक्षाच्या मतांमध्ये आणि जागांमध्ये घट झालेली असेल. या कुंपणावरील मतदारांच्या झोळीत मोदींच्या प्रतिमेहून अधिक काय दिले जाते, यावर आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे यश अवलंबून असेल. पण निदान आत्ता तरी ‘व्यवस्था’ स्वत:च्या प्रेमात पडलेली असून ती पक्षापेक्षा स्वत:ची प्रतिमाच अधिक जपताना दिसत आहे.