News Flash

ज्येष्ठांचे समाजभान

उरण येथील विभावरी पाडगांवकर यांनी पन्नाशीच्या स्त्रियांना एकत्र आणले.

प्रतिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्र राज्यात जिल्हानिहाय अनेक ज्येष्ठ नागरिक संघांची व त्या संघांच्या शिखर कार्यकारिणीची स्थापना झालेली आहे. त्याद्वारे अनेक सामाजिक उपक्रमांना चालना मिळालेली आहे. ज्येष्ठ नागरिक संघांमधून अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध असते. त्यांचे ज्ञान, अनुभव, हाताशी उपलब्ध असणारा वेळ यांचा योग्य मेळ घातल्यास ज्येष्ठ नागरिक संघ अनेक भरीव विधायक कार्ये समाजासाठी करू शकतात. त्याविषयी..

व  य हा निव्वळ आकडा आहे. तो शरीर व मनाला अनुभवांची ऊर्जा देतो. सामाजिक बांधिलकीचे भान देतो. विधायक विचारांना कृतीची जोड देतो. अर्थात ‘एक से दो भले’ या न्यायाने त्या ऊर्जेचे संमीलीनीकरण होते तेव्हा समाजकार्याला एक नवे परिमाण प्राप्त होते. महाराष्ट्र राज्यात जिल्हानिहाय अनेक ज्येष्ठ नागरिक संघांची व त्या संघांच्या शिखर कार्यकारिणीची स्थापना झालेली आहे. त्याद्वारे अनेक सामाजिक उपक्रमांना चालना मिळालेली आहे. ज्येष्ठांच्या वयाचा, विविध कार्यक्षेत्रांतील अनुभवांचा फायदा या उपक्रमांना प्रत्यही होत असतो. वैद्यकीय सोयीसुविधांमुळे ज्येष्ठत्वाचे वय व निकष यांची परिमाणे बदलली आहेत. त्याचाही लाभ या सामाजिक उपक्रमांना चालना मिळण्यास होतो.

पुण्यातील ‘आयएलसी’ या संस्थेतर्फे असे सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची पोचपावती दिली जाते. संस्थेच्या अध्यक्षा अंजली राजे सांगतात, ‘‘आयएलसी-आय ही संस्था ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रशिक्षण शिबिरे घेत असते. गतवर्षी प्लॅस्टिक प्रदूषण, पाण्याचे व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा विविध विषयांवर कार्यशाळा घेतल्या गेल्या. त्यात महाराष्ट्रातील पंचवीस ज्येष्ठ नागरिक संघांनी सहभाग घेतला. कार्यशाळेतील विषयांवर ज्यांना प्रकल्प सादर करायचा आहे त्यांनी तीन महिन्यांत तो लिखित व सीडी स्वरूपात पाठवावा, असे आवाहन करण्यात आले.

रवींद्र निंबाळकर हे ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी परिसराचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सर्वप्रथम ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ या प्रकल्पाची जबाबदारी घेतली. स्वत:च्या राहत्या घराच्या हजार स्क्वेअर फुटांच्या गच्चीत जमा होणारे पावसाचे पाणी फिल्टर लावून बोअरवेलमध्ये सोडले. या कामातून जलसाठा चांगल्या प्रकारे होतो हे लक्षात आल्यावर त्यांनी जलतज्ज्ञ कर्नल शशिकांत दळवी यांचे व्याख्यान ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित केले. या व्याख्यानाला सांगवी परिसरातील सोसायटीतील पदाधिकारी व नगरसेवकांना निमंत्रित केले. त्यांना ही संकल्पना समजावली. सुरुवातीला हे काम लोकांच्या गळी उतरवणे कठीण गेले, पण पिंपरी-चिंचवडमधील पाणीटंचाईची जाणीव करून दिल्यावर काही सोसायटय़ा या कामासाठी पुढे आल्या. त्यांना नगरसेवकांतर्फे फिल्टर पुरवले. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी फिल्टरचा खर्च प्रामुख्याने येतो. फिल्टर मिळाल्यावर लोकांनी स्वेच्छेने आपापल्या सोसायटय़ांमध्ये हे काम सुरू केले. त्यातून आत्तापर्यंत वीस लाख लिटर पाणी जमिनीत मुरेल इतके काम झाले.

हा प्रोजेक्ट यशस्वीपणे राबवल्याबद्दल ‘आयएलसी-आय’चा मानाचा प्रथम पुरस्कार या संघाला प्राप्त झाला. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड इथल्या अनेक शाळांमधून आज राबवला जात आहे. या ज्येष्ठ नागरिक संघाचा आणखी एक उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. गणेश विसर्जन काळात मूर्ती हौदात विसर्जित केल्यावर पुन्हा पाण्यात सोडल्या जातात. मूर्तीची विटंबना टाळण्यासाठी सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाने मूर्ती दान करण्याची योजना राबवली. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुनर्वापर होतो. मुख्य म्हणजे त्यामुळे पर्यावरणाची हानी टळते. यापुढील काळात ज्येष्ठांसाठी मोबाइल ट्रेनिंग, वृक्षारोपण, स्वच्छता कामगार स्त्रियांचा सत्कार असे अनेक कार्यक्रम राबवण्याची संघाची योजना आहे.

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात पुढाकार आहे. हा संघ गरजू ज्येष्ठांच्या उपजीविकेसाठी रोजगाराची गरज पडल्यास ती जबाबदारी उचलतो. ज्येष्ठांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार बागकाम, सुरक्षारक्षक, कॉम्प्युटर टायपिस्ट असे रोजगार त्यांना मिळवून देण्यात मदत करण्यात येते. या संघाने केमिस्टशी संपर्क साधून ज्येष्ठांना औषधखरेदीत दहा टक्के व पॅथॉलॉजी लॅबशी संपर्क साधून तपासणीत पन्नास टक्के सवलत मिळवून दिली आहे. त्याचा अनेक ज्येष्ठ लाभ घेतात. मेडिकल असोसिएशनच्या मदतीने केस पेपर काढणे, ऑपरेशन व निवास व्यवस्था यातही सवलत दिली जाते.

त्याशिवाय एकाकी वयस्कांना घरपोच दूध, किराणा, भाजीपाला आणून देणे, लाँड्रीचे कपडे देणे अशा सेवा दिल्या जातात. सोशिओलॉजी, सायकोलॉजी, समाजसेवा या विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणसंस्था प्रकल्प देतात. त्याअंतर्गत या कामासाठी विद्यार्थ्यांची मदत घेतली जाते. ही सेवा देणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यासाठी मानधन दिले जाते. मात्र सधन विद्यार्थी ही सेवा विनामूल्य करतात. या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे घरोघरी एक विशिष्ट प्रकारची जाळी बसवलेली बास्केट देण्यात येते. त्यात स्वयंपाकघरांतील कचरा जमवण्यात येऊन त्यातून खत तयार करण्यात येते. त्या खताचे वाटप केले जाते व बास्केटचा पुनर्वापर केला जातो. मानसिंगराव जगताप सांगतात, ‘‘आम्ही स्थानिक वृद्धाश्रमांशी संपर्क साधतो व गरीब वृद्धांची तिथे विनामूल्य व्यवस्था करतो. तसंच अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची व्यवस्था आम्ही ‘सावली’ केअर सेंटरमध्ये करतो. ही संस्था अशा वृद्धांची शुश्रूषा करते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य अशा विविध सेवा त्यांना पुरवते.’’

उरण येथील विभावरी पाडगांवकर यांनी पन्नाशीच्या स्त्रियांना एकत्र आणले. ८ मार्चला महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर करत वृक्षारोपण, पर्यावरण, भ्रूणहत्या यावर कार्यक्रम सादर केले. या संघाने झोपडपट्टीतील स्त्रियांना विविध खाद्यपदार्थ शिकवून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. ज्या स्त्रिया कधी घराबाहेर पडल्या नव्हत्या त्या आज अशा विविध उपक्रमांमुळे व या ज्येष्ठ नागरिक संघातील स्त्रियांच्या मार्गदर्शनामुळे स्वावलंबी बनल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठ, शासनातर्फे करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कामांवर स्वेच्छेने उत्तम प्रकारे देखरेख करू शकतात याचा आदर्श वस्तुपाठ ठाणे येथील श्रीनगर ज्येष्ठ नागरिक संघाने घालून दिला. श्रीनगर (ठाणे) येथून मुलुंडकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद होता. मधोमध विशाल वृक्ष होता. तो दुसरीकडे हलवून व वाटेतील कंपनीला कंपाऊंड वॉल मागे घ्यायला लावून ज्येष्ठांच्या नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे या विभागात पाइप गॅसचे वितरण सुरू झाले. रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले. समाजकंटकांनी हलवलेला रिक्षा स्टँड पुनश्च नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. या संघाचे अध्यक्ष विजय नागराज म्हणतात, ‘‘एकूण कार्यमग्न समाजातील तरुणांना या सेवाभावी ज्येष्ठांनी समाजाभिमुख बनवले व सामाजिक दायित्वाची त्यांना जाणीव करून दिली हे सत्य आहे.’’ अशी रास्त जाणीव ठेवणारे अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. त्यातील एक ‘सीनिअर सिटिझन्स क्लब’ ठाणे नॉर्थ. हा क्लब दर वर्षी दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना भरीव मदत देत असतो. या क्लबचे अध्यक्ष सुरेश गुप्ते व इतर सभासद यांच्या अथक प्रयत्नातून गतवर्षी ‘नाम’ फाऊंडेशनला एक लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला. निवृत्तीउत्तर काळात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे याप्रसंगी मकरंद अनासपुरे यांनी खास कौतुक केले.

ज्येष्ठांसाठी समाजसेवा करणारे अनेक संघ आहेत. तसेच शासकीय पातळीवरही त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर होत असतात. दुर्दैवाने त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही. यासाठी ‘फेसकॉम कोकण प्रादेशिक विभाग’ यासारख्या शिखरसंस्था प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवतात. या संस्थेचे अध्यक्ष रमेश पारखे यासंबंधी माहिती देतात. ‘आईवडील व ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह व पालनपोषण कायदा २००७’ हा अस्तित्वात आला. या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आतापर्यंत आम्ही नऊ प्रकरणे हातावेगळी केली आहेत. त्यावेळी असे लक्षात आले की, पोलीस यंत्रणा, शासकीय व न्यायव्यवस्थेलाच या कायद्यातील तरतुदींची विशेष माहिती नाही. यासाठी ‘फेसकॉम’ने या सर्व यंत्रणांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात आला, फेसकॉमतर्फे निराधार वृद्धांना संरक्षण देण्याचेही कार्य प्राधान्याने करण्यात येते. यासाठी समाजकल्याण खात्याचे अधिकारी, पोलीस यंत्रणा यांचे साहाय्य घेण्यात येते.

ज्येष्ठ नागरिक संघांमधून अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध असते. त्यांचे ज्ञान, अनुभव, हाताशी उपलब्ध असणारा वेळ यांचा योग्य मेळ घातल्यास ज्येष्ठ नागरिक संघ अशा प्रकारची अनेक भरीव विधायक कार्ये समाजासाठी करू शकतात.

माधुरी ताम्हणे madhuri.m.tamhane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2017 1:05 am

Web Title: senior citizens organization can do many constructive work for society
टॅग : Senior Citizens
Next Stories
1 माझ्या घरी मी पाहुणी
2 चिराच होईन इथे चिऱ्यातिल
3 चंदन आणि चांदणेही..
Just Now!
X