विदेशातलं एकटं फिरणं स्वस्तात मस्त कसं करायचं?

सुजित सावंत

दोस्तमंडळी, कुटुंबीय यांच्याबरोबरचा प्रवास नेहमीच होतो. पण एकटय़ाने प्रवास करण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. विशेषत विदेशवारी एकटय़ानेच करायला मला आवडते. आतापर्यंत दुबई आणि अमेरिका मी एकटय़ानेच फिरून पालथी घातली आहे. आयुष्यातली सगळ्यात अविस्मरणीय सहल मी एकटय़ाने केली आहे हे ऐकून लोकांना फार अप्रूप वाटतं. ‘तू एकटय़ाने काय केलंस दिवसभर तिथे? कंटाळा नाही आला? एकटाच कसा काय फिरलास? राहिलास कुठे? खाल्लंस काय? एकटय़ाने प्रवास करणं फार महागात पडलं असेल ना?’ असे अनेक प्रश्न लोक विचारतात. तुम्ही सहलीचं नियोजन व्यवस्थित केलंत तर एकटं फिरताना या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आणि यातला एकही प्रश्न उद्भवत नाही.

प्रवास करताना खर्चाचा सगळ्यात मोठा वाटा असतो विमानाच्या तिकिटांचा. कमी दरात तिकीट हवं असेल तर यावर एकाच उपाय तो म्हणजे अ‍ॅडव्हान्स बुकिंग. सहलीच्या चार-सहा महिने आधी विमान तिकीट बुक करून ठेवा. हल्ली तर अनेक एअरलाइन्स कंपन्या लवकर बुकिंग केलं तर सवलत देतात. शिवाय काही कॉम्बो ऑफरसुद्धा मिळू शकतात. माझ्या दुबईच्या ट्रिपसाठी मी हीच शक्कल लढवली होती. तिकिटानंतर राहण्याची सोय खर्चीक असू शकते. परदेशातील डिसेंट हॉटेलमध्ये राहणं फार खर्चीक होऊ  शकतं. मुळात एकटय़ाने प्रवास करणं म्हणजे भरपूर फिरणं आणि त्या शहरात/देशात राहून शक्य तितका अनुभव मिळवणं. त्यामुळे हॉटेल रूमवर तुम्ही केवळ झोपण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी येता. त्यामुळे हॉटेलवर पैसा खर्च करणं व्यर्थ असतं. युथ हॉस्टेल किंवा बॅगपॅकर्स हॉस्टेल शोधणं किंवा तिथल्या स्थानिकांच्या घरात ते न वापरणाऱ्या जागेचे पैसे देऊन स्वत:ची सोय करणं चांगलं. Airbnb किंवा couchsurfing सारख्या वेबसाइट्स अशा प्रकारे राहण्याची सोय शोधण्यासाठी कामी येतात. यामुळे राहण्याचा खर्च खूपच कमी होतो. या वेबसाईट्स आणि इथली राहण्याची सोय सेफ असली तरी थोडी रिस्क घेण्याची तयारी ठेवायला हवी.

माझ्या न्यूयॉर्क सहलीदरम्यान मी किफायतशीर युथ हॉस्टेलचा पर्याय आजमावला. युथ हॉस्टेल्स हा अशा एकटय़ा प्रवाशांसाठी हमखास सुचवला जाणारा पर्याय आहे. मी राहात असलेलं युथ हॉस्टेल न्यूयॉर्कच्या अगदी सुप्रसिद्ध आणि राहण्याच्या दृष्टीने महागडय़ा अशा टाईम स्क्वेअरपासून अगदी दोन गल्ल्यांवर होतं आणि तुलनेनं अगदी स्वस्त. अशा हॉस्टेलमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड कॉस्ट असते. शिवाय वाय-फाय, दररोजची साफसफाई, इनडोअर गेम्स, लायब्ररी अशा अनेक सुविधाही इथे मिळतात. कधी तीन- चार तर कधी ६ बेड असणाऱ्या हॉस्टेलच्या खोलीत राहण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इथे विविध देशांतून एकटे भटकायला आलेले प्रवासी भेटतात. एकमेकांच्या संस्कृतींची ओळख होते. अशा सहप्रवाशांकडून मला शहरांबद्दल खूप चांगली माहिती मिळाली, शिकायला मिळालं आणि मुख्य म्हणजे आयुष्यभरासाठीचे मित्र मिळाले.

न्यूयॉर्कमध्ये फिरताना एक गोष्ट लक्षात आली की, सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय सगळ्यात फायदेशीर ठरतो. लंडनची टय़ूब आणि न्यूयॉर्कमधली ट्रेन मला माझ्या सहलींदरम्यान मुंबईच्या लोकलची आठवण देऊन गेली. एकटे फिरत असताना टॅक्सी भाडय़ाने घेण्यापेक्षा असं सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेतून फिरणं फार सोयीस्कर आणि कमी पैशात होऊन जातं. असं एकटय़ाने फिरायला जाण्याआधी एकदा गूगलवर ‘सोलो ट्रॅव्हलर्स’साठीच्या वेबसाइट्स किंवा त्या त्या शहरातल्या ट्रेन, म्युझियम, अम्युझमेंट पार्कमध्ये मिळणाऱ्या सवलतींची माहिती आधी बघायलाच हवी.

प्रवासातलं खाणं त्या त्या शहराच्या संस्कृतीशी ओळख करून देतं. त्यामुळे मी दुबई आणि न्यूयॉर्कमध्ये फिरताना शक्यतो तिथेच मिळणारे स्थानिक पदार्थ टेस्ट करण्यावर भर दिला. भारतात मिळत नाहीत अशा डिश प्रीफर केल्या. एकंदरीत अशी एकटय़ाने ट्रिप प्लॅन करणं तितकंसं कठीण नसतं. फक्त गरज असते थोडं धाडस दाखवून तुमची ही इच्छा सत्यात उतरवण्याची. काही सहली फसतील, काही फार छान होतील, पण त्यालाच अनुभव म्हणतात. हा अनुभव तुमचं आयुष्य तर बदलून टाकेलच, पण तुमचं मन नेहमी या अनुभावाला जपत राहील. वेगळी संस्कृती, नवीन शहरं, खाद्यसंस्कृती आणि महत्त्वाचं म्हणजे तिथली माणसं एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातील.