News Flash

कापड उद्योगात पतंजलीचा प्रवेश, दिवाळीच्या मुहूर्तावर दालनाचे उद्घाटन

डिसेंबरपर्यंत देशात अशीच २५ शोरुम उभारण्यात येणार असल्याचे बाबा रामदेव यावेळी म्हणाले.

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली जीन्सची मागच्या काही वर्षांपासून जोरदार चर्चा होती. या वर्षाच्या अखेरीपर्यंत कंपनी आपला कापड उद्योग सुरु करेल असे म्हटले जात होते. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे, पतंजली परिधान या पतंजलीच्या कपड्यांच्या पहिल्यावहिल्या शओरुमचे उद्घाटन बाबा रामदेव यांनी केले आहे. दिल्लीतील या शोरुमच्या उद्घाटनाच्या वेळी कुस्तीपटू सुशील कुमार आणि चित्रपट निर्माते मधुर भांडारकर उपस्थित होते. डिसेंबरपर्यंत देशात अशीच २५ शोरुम उभारण्यात येणार असल्याचे बाबा रामदेव यावेळी म्हणाले. पतंजलीच्या या शोरुममध्ये पारंपरिक पोशाखासोबतच पाश्चिमात्य पद्धतीचे कपडेही मिळणार आहेत. तसेच ग्राहकांना याठिकाणी दागिने आणि इतर गोष्टीही खरेदी करता येणार आहेत. सध्या याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जीन्सची किंमत ११०० रुपये असून दिवाळीच्या निमित्ताने २५ टक्के सूट देण्यात येणार आहे.

याठिकाणी पुरुष, स्त्रिया, लहान मुले, डेनिम, पारंपरिक, कॅज्युअल, फॉर्मल अशा सर्व प्रकारचे ३००० कपड्यांचे प्रकार उपलब्ध असल्याचे पतंजलीकडून सांगण्यात आले आहे. हे कपडे लिवफीट, आस्था आणि संस्कार या ब्रँडचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. याबाबत एक ट्विट करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे खादीने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्त्व केले होते. त्याचप्रमाणे पतंजली देशात आर्थिक स्वातंत्र्य आणेल असे यामध्ये म्हटले आहे. याआधी पतंजलिचे कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्णन यांनी जीन्सबाबत महत्त्वाचे विधान केले होते. जीन्स ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. विदेशी गोष्टींच्या वापराबाबत आपण दोन गोष्टी करु शकतो. एकतर त्याचा बहिष्कार करणे अन्यथा आपल्या पद्धतीने त्याचा स्वीकार करणे. सध्या जीन्स लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याचा बहिष्कार करणे शक्य नसल्याने आपण त्यांना स्वदेशी बनविणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याची स्टाईल, डिझाईन, कापड भारतीय पद्धतीनुसार बनवायला हवे असे ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 2:48 pm

Web Title: baba ramdev patanjali inaugurates first showroom paridhan in delhi on the occasion of diwali
Next Stories
1 आणखी एका वाघिणीचा बळी, गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर
2 मोदी हिटलरचा भारतीय अवतार – मल्लिकार्जून खरगे
3 ही तर २०१८ मधील ईस्ट इंडिया कंपनीच; ओवेसींची काँग्रेस, भाजपावर टीका
Just Now!
X