-डॉ. लक्ष्मण जेस्सनी, (कन्सल्टंट -इन्फेक्शियस डीजीज, अपोलो रुग्णालय: नवी मुंबई)

कोविड-१९ विषाणू एव्हाना जगभरातील ११० पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला असून त्यावर लस किंवा नेमके उपचार अद्याप सापडलेले नाहीत. याबाबतीत एक तर्क असा आहे की तापमानातील वाढ या विषाणूला मारून टाकू शकेल आणि त्यामुळे लवकरच सुरु होणार असलेल्या उन्हाळ्यात कोरोना संसर्ग थोपवला जाईल. परंतु उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा कोविड-१९ वर नेमका काय प्रभाव होईल याबाबद्दल शास्त्रज्ञांनी मात्र ठाम उत्तर दिलेले नाही.

निरीक्षणातून असे आढळून आले आहे की हा विषाणू कोरड्या पृष्ठभागावर ८ ते १० दिवस सक्रिय राहू शकतो आणि मानवी शरीरात ३७ अंश सेल्सियस तापमानामध्ये जिवंत राहतो. इतर सर्व विषाणू हे उष्णतेमुळे निष्क्रिय होतात किंवा नाश पावतात. परंतु कोविड-१९ हा विषाणू निष्क्रिय किंवा नाश होण्यासाठी नेमके किती तापमान आवश्यक आहे हे अद्याप समजलेले नाही.

या विषाणूंची वाढ रोखण्यासाठी किंवा त्यांचा नायनाट व्हावा यासाठी सूर्यप्रकाश आणि उष्णता उपयोगी पडू शकते अथवा नाही याबद्दल जगभरातील तज्ञांनी वेगवेगळी मते मांडली असली तरी एका बाबतीत त्यांनी सहमती दर्शवली आहे की योग्य स्वच्छता राखली गेल्यास या रोगाचा प्रसार रोखता येऊ शकतो. परंतु कोरोना विषाणू तीन बाबतीत संवेदनशील असल्याचे समजले आहे: सूर्यप्रकाश, उच्च तापमान आणि आर्द्रता. सूर्यप्रकाशामुळे या विषाणूच्या वाढण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो तर उष्णतेमुळे तो निष्क्रिय होतो.

या मुद्द्यावर तज्ञांमध्ये विचारविनिमय, चर्चा सुरु असली तरी उन्हाळा पूर्णपणे सुरु व्हायला अद्याप एक महिना अवकाश आहे. तोपर्यंत काही साध्या उपाययोजना करून या रोगाच्या संसर्गाला प्रतिबंध घालता येऊ शकेल.

· आजारी व्यक्तीच्या जवळ जाणे टाळावे.

· स्वतःचे डोळे, नाक किंवा तोंड यांना स्पर्श करू नये.

· जर तुम्ही आजारी असाल तर घरी रहा.

· शिंक येत असेल तर तोंडासमोर टिश्यू धरा आणि शिंकून झाल्यावर लगेचच तो टिश्यू कचऱ्यात टाका.

· तुमच्याकडे टिश्यू नसताना अचानक शिंक आली तर हाताचे कोपर तोंडासमोर धरून शिंका.

· सतत वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी अल्कहोल असलेले स्टॅंडर्ड क्लिनिंग स्प्रे किंवा वाईप्स यांचा वापर करा.

तुमचे हात सतत धुवा, हात धुताना साबणाचा वापर करून कमीत कमी २० सेकंद हात चोळून स्वच्छ करा.