डॉ. प्रशांत बोराडे

करोना विषाणूने सध्या देशात थैमान घातलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनच्या कालावधीत वाढ केली आहे. प्रशासन जरी आपल्यासाठी सतत विविध उपाययोजना करत असलं तरीदेखील आपण स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे करोनाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा. कोणत्याही आजाराचा सामना करायचा असेल तर रोगप्रतिकारक शक्ती बळकट असणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते पाहुयात.

१. घरीच रहा आणि सुरक्षित अंतर राखा-
जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला सर्दी-खोकला असेल तर त्यांना शक्यतो घराबाहेर पाठवू नका. तसंच जर घरात एखादी वयस्क व्यक्ती किंवा लहान मुलं असेल तर त्यांनादेखील घराबाहेर पाठवू नका कारण अशा व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी घरी राहा. तसंच शक्यतो इतरांची बोलताना वैगरे मर्यांदित अंतर ठेवा.

२.नियमित हात धुवा –
दिवसातून जास्तीत जास्त वेळा साबणाने नियमितपणे हात धुवा. यामुळे हातावरील विषाणूंच्या प्रतिबंधासाठी ते उपयोगी ठरतं. आपण अनेक वस्तूंना स्पर्श करीत असतो. ज्यामुळे आपल्या हातावर जंतू असतात. वारंवार नाक, तोंड, डोळ्यांना हात लावल्याने हातावरील विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.

३. कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जाऊ नका –
देशात करोना विषाणूचं थैमान घातल्यामुळे घाबरुन जाऊ नका. त्याऐवजी आवश्यक ती काळजी घ्या. अफवांवर विश्वास ठेऊ नका. सामाजिक अंतर राखून घरी आपल्या कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ घालवा, फोनद्वारे मित्रांशी संपर्क साधा आणि तुम्हाला आवडेल असे छंद जोपासा. स्वतःसाठी वेळ द्या.

४. शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करा –
शिंकल्यानंतर तसेच खोकताना नाका-तोंडातून निघणाऱ्या तरल पदार्थांमध्ये अनेक सूक्ष्म जंतू असतात. त्यामुळे शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवा. तसंच वेळी योग्यते उपचार करुन सर्दी-खोकल्या सारख्या समस्येला दूर करा.

५. मास्क वापरा-
सर्दी, खोकला झाल्यास आपला संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी डॉक्टरी सल्ल्याने योग्य तेच मास्क वापरा. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी योग्य मास्कचा वापर करा.

६. निर्जंतुकीकरणावर भर द्या –
आपले घर स्वच्छ ठेवा. दरवाजाची हँडल्स, लॉक, टेबल्स, स्वयंपाक घरातील ओटा आणि सेल फोन, रिमोट, पेन, कीबोर्ड आदी वस्तूंना नियमितपणे निर्जंतुकीकरण करा. असे केल्यावर आपला चेहरा, नाक किंवा डोळे स्पर्श करणे टाळा आणि ताबडतोब आपले हात धुवा. आठवड्यातून एकदा तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला डिसइन्फेटिंग वाइप्सने साफ करा. या वाइप्समुळे मोबाईलच्या वरील भागावरील किटाणू मरतात.

(डॉ. प्रशांत बोराडे, क्रिटिकल केअर युनिट, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई)