देशभरात फोन कॉलआधी ऐकू येणारी कॉलर ट्यून आजपासून (दि.१५) बदलणार आहे. करोना व्हायरसबाबत जनजागृती करणारी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून आता ऐकू येणार नाही. मात्र त्याची जागा आता नवीन कॉलर ट्यून घेणार आहे. देशात करोना लसीकरणाला सुरूवात होत असल्याने आता बच्चन यांच्या आवाजातील जुनी कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.१५) पासून मोबाइलची डिफॉल्ट कॉलर ट्यून बदलणार आहे.

देशात करोना लसीकरणाला सुरू होणार असून नवीन कॉलर ट्यून लसीकरणाबाबत जनजागृती करणारी असेल. नवीन कॉलर ट्यून महिलेच्या आवाजात असेल आणि ‘नवं वर्ष लसीच्या रुपात नवी आशा घेऊन आलं आहे’ अशाप्रकारचा संदेश या ट्यूनमधून दिला जाईल. शिवाय भारतीय लसीवर विश्वास ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असा संदेशही जनतेला नवीन कॉलर ट्यूनद्वारे दिला जाईल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत अमिताभ बच्चन यांच्याऐवजी एखाद्या करोना योद्ध्याचा आवाज असणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. त्यामुळे बिग बी यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढावी, असे याचिकेत नमूद केले होते.