News Flash

नावं ठेवणे थांबवू या..!

नाव ठेवणे, शिक्का मारणे किंवा लेबल लावणे हे विशेषण सहसा आपण स्वत:ला किंवा इतरांना लावताना दिसतो.

मनोमनी

डॉ.अमोल देशमुख  

नाव ठेवणे, शिक्का मारणे किंवा लेबल लावणे हे विशेषण सहसा आपण स्वत:ला किंवा इतरांना लावताना दिसतो. दैनंदिन जीवनात आपण सहजच स्वत:ला आणि एकमेकांना नाव ठेवतो/ लेबल लावतो. व्यक्तीचे एखाद्या वैशिष्टय़ावर, गुणांवर, वागणुकीबद्दल जेव्हा आपण लेबलिंग करण्यात गुंततो, तेव्हा आपण संपूर्ण व्यक्तीचे सर्वच स्तरांवर वर्णन करतो आणि व्यक्तीला संपूर्ण दोषी ठरवतो. व्यक्तीला चिकटवलेल्या त्या विशेषणाच्या कॅमेऱ्यातूनच आपण त्या व्यक्तीला नेहमी बघत असतो.

उदाहरणार्थ मी परीक्षेत नापास झालो म्हणजे मी एक अपयशी व्यक्ती आहे, तिला वारंवार कामासाठी उशीर होत असल्याने ती बेजबाबदार आहे किंवा तो खोटारडा आहे, रागीट आहे, भित्रा आहे, कामचुकार आहे अशा प्रकारची नावरूपी विशेषण लावतो.

नाव ठेवणे हा एक अविवेकी विचारसरणीचा भाग आहे, ज्यातून वेदनादायक असह्य़ भावनांची उत्पत्ती होते. आपण एखाद्या परीक्षेत अयशस्वी झाल्यास आणि याचा अर्थ व्यक्तीने आपण एक अपयशी व्यक्ती आहोत असा घेतल्यास दु:ख, निराशा, अपराधीपणासारख्या असाहाय्य भावनांना उत्तेजन मिळेल. आपण केवळ एका परीक्षेत अयशस्वी झालो समजल्यास बहुधा वाईट वाटेल जे आपण सहन करू शकतो.

एखादे काम विसरल्यास आपण आपल्या पतीला जर बेजबाबदार असा शिक्का मारला तर मनात असह्य़ भावनांचे वादळ उठून नात्यामध्ये कलह निर्माण होऊ  शकतो. परंतु जर आपण त्या व्यक्तीचे ते वर्तन आवडले नाही ही समस्या समजली तर त्याच्याशी चर्चा करणे आणि संभाव्यपणे सोडवणे सोपे होईल. आपण शिक्का मारण्याच्या अविवेकी विचारसरणीचा अवलंब करतोय, हे जेव्हा स्वत:ला लक्षात येते, त्या वेळी शिक्का न मारता आपल्याला न आवडलेल्या वर्तनाबद्दल बोलायला पाहिजे म्हणजे कृतीबद्दल बोला व्यक्तीबद्दल नाही.

मी स्वत:कडे कसे पाहतोय यावर मी नियंत्रण ठेवू शकतो, समजणे गरजेचे आहे, परंतु इतरांचे माझ्याबद्दलचे मत एकदम बदलू शकत नाही ते बदलण्यासाठी मला माझ्या नियंत्रणातील घटकांवर सतत काम करत राहावे लागेल. कधी कधी इतरांनी त्यांच्यावर लावलेल्या लेबलांनुसार जगण्याची लोक जाणूनबुजून निवड करतात. स्वत:ला व इतरांना नाव ठेवण्याची सवय लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वापासून परावृत्त करतेच, एकमेकांमध्ये निर्माण होणाऱ्या चांगल्या संबंधांना बिघाडते.

आपण करीत असलेल्या ‘वाईट’ गोष्टी आपल्याला संपूर्ण वाईट व्यक्ती बनवत नाहीत आणि आपण ज्या ‘चांगल्या’ गोष्टी करतो त्या आपल्याला संपूर्ण चांगला व्यक्ती बनवत नाहीत. खरं तर आपण सर्व जण दोघांचे मिश्रण आहोत.

जेव्हा आपण आपल्या चुकांसाठी स्वत:ला दोषी ठरवतो आणि स्वत:वर शिक्का मारतो तेव्हा अस्वस्थ होतो. जेव्हा आपण इतरांना त्यांच्या चुकांबद्दल दोषी ठरवतो, तेव्हा आपण रागात येतो. आपण भीती, उदासीनता, राग या भावना जाणल्याबद्दल आणखीच अस्वस्थ होऊन स्वत:ला आणखीनच दोषी ठरवतो आणि या चक्रात अडकतो.

आपण केलेल्या चुकांबद्दल जेव्हा इतर लोक आपल्याला नाव ठेवतात, तेव्हा आपण स्वत:ला विचारा की आपण खरोखर काही चुकीचे केले आहे का? तसे असल्यास, ते पुन्हा न करण्याचा प्रयत्न करा. आपण काहीही चुकीचे केले

नसल्यास आपण स्वत:ला स्मरण करून देऊ  शकता की दुसरी व्यक्ती चुकीची असू शकते आणि तीही चुकू शकते. स्वत:ची आणि इतरांची विनाशर्त स्वीकृती विकसित करणे लेबलिंग या विचारसरणीचा सामना करण्यासाठी महत्त्वाची ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2021 3:19 am

Web Title: everyday life we easily name label ourselves each other ssh 93
Next Stories
1 इन्फ्लुएन्झा लस आणि करोना
2 Video: करोना रुग्णांच्या पायात ‘ब्लड क्लॉट्स’चा धोका; समजून घ्या डॉक्टरांकडून
3 स्मार्टफोनवरील ‘प्रो’ छायाचित्रण
Just Now!
X