26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी लाँच झालेला FAU-G (Fearless and United Guards) हा ‘मेड इन इंडिया गेम’ भारतीय गेमप्रेमींमध्ये सुरूवातीला चांगलाच लोकप्रिय ठरला. लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी हा गेम डाउनलोड केला होता. पण आता लाँचिंगच्या 10 दिवसांनंतर FAU-G च्या लोकप्रियतेत घट झाल्याचं दिसतंय.

पहिल्या दोन दिवसांमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त डाउनलोड झाल्यानंतर प्ले-स्टोअरवर या गेमला युजर्सनी पाचपैकी 4.7 स्टार रेटिंग दिली होती. पण आता अवघ्या 10 दिवसांमध्येच युजर्सकडून या गेमबाबत निगेटिव्ह रिव्ह्यू येण्यास सुरूवात झाली आहे. 4.7 रेटिंगवरुन या गेमला आता युजर्सनी फक्त 3 स्टार रेटिंग दिली आहे. FAU-G च्या गेम-प्ले आणि ग्राफिक्सबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. गेमने अपेक्षाभंग केल्याचं काहींनी म्हटलंय. तर, पब्जीप्रेमी मुद्दाम या गेमला कमी रेटिंग देत असल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या FAU-G केवळ गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरील थीममध्येच उपलब्ध आहे. पण लवकरच ‘टीम डेथमॅच’, ‘फ्री फॉर ऑल’ आणि ‘बॅटल रॉयल मोड’ अशा तीन शानदार थीम गेममध्ये येणार आहेत.

प्ले-स्टोअरवर टॉप फ्री गेम ठरला असला तरी अद्याप हा गेम आयफोन युजर्ससाठी लाँच झालेला नाही, त्यामुळे आयफोन युजर्सना FAU-G खेळण्यासाठी अजून वाट बघावी लागणार आहे. भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन झाला. त्यानंतर FAU-G गेमची घोषणा झाली होती. nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे. 460 MB साइजचा हा गेम आहे.

भारतीय सैनिकांवर आधारित :- FAU-G गेमच्या पहिल्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल हे स्पष्ट झालंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

टक्कर कोणाला ? : हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.