स्मार्टफोन म्हणजे सध्या प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झाला आहे. मिनिटा मिनिटाला हातात लागणारा हा फोन थोडा वेळ जरी सोबत नसला तरी आपल्यातील अनेक जण अस्वस्थ होऊन जातात. मोबाईल पाण्यात पडण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. कधी तो चुकून पाण्यात पडतो तर कधी लहान मुले खेळताना तो पाण्यात टाकतात. आता फोन पाण्यात पडला म्हटल्यावर तो खराब होणारच. मग तो दुरुस्तीला देऊन नीट झाला तर ठिक नाहीतर आपला सगळा डेटा जातो शिवाय फोनही जातो. अशावेळी पाण्यात पडलेला फोन पूर्वपदावर आणायचा असेल तर वेळीच काही सोप्या युक्त्या केल्यास त्याचा उपयोग होतो. पावसाळाही काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना या टिप्स तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. पाहूयात घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय…

१. फोन स्विच ऑफ करा – फोन पाण्यात पडला किंवा पूर्णपणे भिजला असेल तर तो वापरण्याचा प्रयत्न करु नका. सर्वात आधी फोन स्विच ऑफ करा. त्यामुळे शॉर्ट सर्कीट होण्याचा धोका टळेल.

२. फोन ओला झाल्यावर आणि स्विच ऑफ केल्यानंतर त्यातील शक्य तितक्या गोष्टी बाहेर काढून घ्या. यामध्ये बॅटरी, सिमकार्ड आणि मेमरी कार्ड यांचा समावेश होतो.

३. मोबाईल ओला झाला असताना चार्जिंगला लावण्याची घाई करु नका. त्यामुळे तो आणखी खराब होण्याची शक्यता असते.

४. एखाद्या सुती कापडाने मोबाईल सर्व बाजूने पुसून घ्या. हलक्या हाताने फोनचा प्रत्येक कोपरा पुसून घ्या. पाणी जास्त प्रमाणात गेले असेल तर व्हॅक्युम ब्लोअरचा वापर करुनही फोन सुकवू शकता. मात्र हे करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.

५. पाण्यात पडलेला फोन हलका पुसून घ्या. एका हवाबंद डब्यात किंवा पिशवीत तांदूळ घ्या आणि त्यात फोन ठेवा. हे एखाद्या कोरड्या जागी काही काळासाठी राहू द्या. यामुळे फोनमधील पाणी शोषले जाते आणि फोन कोरडा होण्यास मदत होते.

६. ओला मोबाईल कधीही हेअर ड्रायरने वाळवू नये. ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवत. त्यामुळे फोन आणखी खराब होऊ शकतो.