प्रीमियम स्मार्टफोन बनविणारी कंपनी वनप्ससने मंगळवारी(दि.१४) भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन OnePlus7 आणि OnePlus7 Pro लाँच केले आहेत. यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या OnePlus7 Pro या स्मार्टफोनसाठी आज पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर आज दुपारी 12 वाजेपासून या स्मार्टफोनसाठी सेल सुरू होत आहे. मात्र, केवळ अॅमेझॉन प्राइम मेंबर्स असलेल्यांनाच या सेलमधून हा फोन खरेदी करता येणार आहे. इतरांसाठी शुक्रवारी(दि.17) दुपारी 12 वाजेपासून दुसऱ्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.

ऑफर्स –
एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 2 हजार रुपयांचं इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय रिलायंस जिओकडून 9000 रुपयांपर्यंतच्या विविध ऑफर्सचा लाभ घेता येईल. तसंच हा स्मार्टफोन नो कॉस्ट इएमआयवर देखील खरेदी करता येईल.

फीचर्स –
पहिल्यांदाच वनप्लसच्या स्मार्टफोन्समध्ये डॉल्बी सपोर्टेड स्पीकर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या कॅमेरामध्ये गुगल लेन्सचा सपोर्ट आहे. त्याच्या आधारे कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा फोटो काढल्यानंतर त्याच्याविषयी माहिती मिळवता येणार आहे. OnePlus 7 Pro हा स्मार्टफोन कंपनीने 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज , 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असणार आहे. 48 हजार 999 रुपये, 52 हजार 999 रुपये आणि 57 हजार 999 रुपये इतकी अनुक्रमे या तिन्ही व्हेरिअंट्सची किंमत आहे. वनप्लस 7 प्रो हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय 9.0 या आवृत्तीपासून विकसीत करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस 9.5 या आवृत्तीवर कार्यरत असणार आहे. या कॅमेऱ्याला ट्रिपल रिअर कॅमेऱ्याचा सेटअप आहे. त्यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असून त्याला 8 व 16 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यांची जोड आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 16 मेगापिक्सल वाइड अँगलने युक्त असणारा कॅमेरा आहे. फोनमध्ये 6.7 आकारमानाचा, क्युएचडी(3220 बाय 1440 पिक्सल) क्षमतेचा 19: 5:9 अॅस्पेक्ट रेशो असणारा व फ्युईड अमोलेड प्रकारातील डिस्प्ले आहे. हा वनप्लसच्या आतापर्यंतच्या फोन्समधील सर्वात चांगल्या दर्जाचा डिस्प्ले असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरचा वापर फोनसाठी करण्यात आला आहे. या मोबाईलची बॅटरी 4 हजार मिलिअँपिअर क्षमतेची असून केवळ 20 मिनिटात 48 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. तसेच हा फोन गरम होऊ नये यासाठी यामध्ये लिक्विड कुलिंग ही सिस्टिम वापरण्यात आली आहे.