अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या आघाडीच्या इ-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता रिलायन्सचं JioMart अ‍ॅप लाँच झालं आहे. अन्य ऑनलाइन शॉपिंग स्टोअर्सप्रमाणे JioMart द्वारे किराणा आणि अन्य सामानाची शॉपिंग करता येईल.

अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी कंपनीने हे अ‍ॅप लाँच केलं आहे. ग्राहक गुगल प्ले-स्टोअर किंवा अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमधून डाउनलोड करु शकतात. जवळपास दोन महिन्यांपूर्वी रिलायन्सने या अ‍ॅपसाठी वेबसाइट लाँच केली होती.

200 शहरांमध्ये कंपनीने आपली ही सेवा सुरू केली आहे. सध्या JioMartवर किराणा सामान, पर्सनल केअर, होम केअर आणि बेबी केअर प्रोडक्ट्स ऑर्डर करता येतील. गुगल प्ले-स्टोअरवर याच्या अँड्रॉइड व्हर्जनची साइज 13 एमबी आणि अ‍ॅपल स्टोअर iOS व्हर्जनची साइज 30.7 एमबी आहे. गुगल प्ले स्टोअरवर लाँच झाल्यापासून एक लाखांहून जास्त जणांनी हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे.

JioMartवर किराणा सामानाच्या खरेदीवर व अन्य अत्यावश्यक सामानावर एमआरपीपेक्षा पाच टक्के सवलत दिली जात आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी झोमॅटो किंवा या क्षेत्रातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा कमी दरात जिओ मार्टवरुन सामान खरेदी करता येईल असा कंपनीचा दावा आहे. तसेच, किमान रक्कमेच्या खरेदीची कोणतीही अट न ठेवता कंपनीकडून सामानाची फ्री डिलिव्हरी दिली जाईल.

JioMartवर कोणते प्रोडक्ट उपलब्ध आहेत ?
फळे, भाज्या, डेअरी, बेकरी, स्टेपल्स, स्नॅक्स, चाहा, कॉफी, पर्सनल केअर, घरातील उपयोगी सामान आणि लहान मुलांशीसंबधित सर्व सामान JioMart वर उपलब्ध आहेत.

कसं कराल ऑर्डर?–
JioMartचा वापर अ‍ॅपऐवजी जर वेबसाइटवर करायचा असेल सर्वात प्रथम तुम्हाला जिओ मार्टच्या https://www.jiomart.com/ या संकेतस्थळावर जावं लागेल. वेबसाइटवर गेल्यानंतर समोरच तुम्हाला एक बॉक्स येईल. त्यामध्ये तुमच्या एरियाचा पिन कोड टाकावा लागेल. तुमचं क्षेत्र ग्रीन झोनमध्ये असेल तर तुम्हाला जिओ मार्टची डिलिव्हरी घरपोच मिळेल.