खरेदीला बाहेर पडल्यावर तुमच्याकडून ठरवल्यापेक्षा जास्त पैसे खर्च होतात का, खरेदीसाठी गेल्यावर नक्की कोणती वस्तू घ्यायची, यावरून तुमच्या मनात गोंधळ निर्माण होतो का, या प्रश्नांची उत्तरे जर होकारार्थी असतील, तर तुम्ही यापुढे खरेदीसाठी बाहेर पडताना एक गोष्ट अवश्य करा. तुम्ही उंच टाचेच्या चप्पल घालून खरेदीला जा. तुम्ही प्रत्येक वस्तू खूप तोलून मापून घ्याल आणि ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च करणार नाही. सहज विचार केला तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र, अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातून ही गोष्ट पुढे आलीये.
अमेरिकेतील ब्रिघम यंग विद्यापीठातील संशोधक जेफ्री लार्सन यांनी हे संशोधन केले. ते या विद्यापीठामध्ये विपणन विषय शिकवतात. त्यांनी केलेल्या संशोधनाप्रमाणे जर तुम्हाला अतिखर्च करण्याची सवय असेल, किंवा खर्च करताना तुमचे स्वतःवर नियंत्रण राहात नसेल, तर तुम्ही उंच टाचेच्या चप्पल घालून खरेदीला जावे. उंच टाचेच्या चप्पल घातल्यामुळे तुम्हाला सातत्याने स्वतःचा तोल राखण्याकडे लक्ष द्यावे लागते. याचाच परिणाम तुमच्या खरेदी करण्याच्या निर्णयावर होतो. तुम्ही कोणतीही वस्तू घेताना तोलून मापून त्याचा विचार करता. त्यामुळे तुम्ही आवश्यक तेवढ्याच वस्तू घेता आणि तुमच्याकडून अकारण कोणत्याही वस्तूंवर खर्च होत नाही.
व्यक्तीच्या शारीरिक संवेदना आणि त्याची निर्णय़ घेण्याची पद्धत यामध्ये काही संबंध असतो का, याचा शोध या संशोधनाच्या माध्यमातून संशोधकांनी लावला आहे. या संशोधनामध्ये लार्सन यांना त्यांचे सहकारी डॅरॉन बिलेटर यांनी मदत केली.