स्मार्टफोन्स आता जवळपास सर्वांकडेच असतात. सर्वचजण सेल्फीच्या मागे असतात. गेम्स खेळतात, मित्रांशी सोशल मीडियावर बोलतात, न्यूज वाचतात. आतातर दिवसेंदिवस आणखी चांगले स्मार्टफोन्स आणि आणखी चांगले अॅप्स येत आहेत. त्याच्यामुळे स्मार्टफोनच्या वापरात चांगलीच वाढ झाली आहे. पण सध्या बऱ्याच जणांना भेडसावणाऱा एक प्रश्न म्हणजे स्मार्टफोन वापरत असताना तो गरम होणं. अनेकदा चार्जिंग करताना, गेम्स खेळताना किंवा अॅप्स वापरताना स्मार्टफोन चांगलाच गरम होतो. मग स्मार्टफोन गरम होणं टाळण्यासाठी या काही टिप्स,

१. स्मार्टफोन चार्ज करताना तो कठीण पृष्ठभागावर ठेवा

स्मार्टफोन चार्ज होत असताना अनेकदा तो तापतो. यावेळी फोनला मऊ पृष्ठभागावर ठेवण्याऐवजी तो कठीण पृष्ठभागावर ठेवा. यामुळे तो जास्त गरम होणार नाही.

२. अॅप्सची संख्या कमी करा
सध्या सगळ्याच स्मार्टफोन्समध्ये १६ जीबी किंवा ३२ जीबी एवढी मेमरी असतेच. त्यामुळे आपण हवी ती अॅप्स डाऊनलोड करतो. पण असं करणं टाळावं. गरजेपुरतीच अॅप्स ठेवावीत. जास्त अॅप्स ठेवली तर आपल्या फोनवर त्याचा ताण येऊ शकतो, आणि त्यामुळे ती गरम होऊ शकतात.

३. फोनचं जॅकेट/कव्हर काढा

फोनचं जॅकेट किंवा कव्हर काढणं हे तो गरम होणं टाळण्यासाठीचा सर्वात सोपा उपाय आहे. यामुळे फोन थंड व्हायला मदत होईल

४. योग्य ब्रँडची बॅटरी आणि चार्जर वापरा

डुप्लिकेट बॅटरी आणि चार्जर स्वस्त असले तरी त्यांचा सतत वापर हा दुष्परिणामकारक ठरू शकतो. या कारणांमुळेही फोन तापू शकतो.

५. रात्रभर फोन चार्ज करू नका

अनेकदा आपण सोयीचं म्हणून रात्रभर फोन चार्ज करायला ठेवतो. पण ही पध्दत अतिशय चुकीची आहे. बॅटरी संपूर्णपणेचार्ज झाल्यावर प्लग काढून ठेवणंल गरजेचं असतं. पण रात्रभर चार्जिंग चालू राहिलं तर बॅटरी तापण्याचा धोका असतो. काही वेळा बॅटरीचा स्फोट झाल्याचीही उदाहरणं आहेत