हिवाळ्याचे दिवस सुरु झाले की बाजारामध्ये हिरवेगार पेरु दिसू लागतात. पेरु म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे मीठ आणि तिखट टाकून केलेल्या फोडी. पेरुमध्ये व्हिटॅमीन सी, लायकोपेन आणि अँटीऑक्सीडेंट्सने मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्यामुळे पेरु हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मात्र केवळ पेरुच नाही तर पेरुच्या पानांचेही अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात पेरुच्या पानांचे फायदे.

पेरु या बहुगुणी फळांच्या पानामध्ये यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात. त्यासोबतच तुम्ही दिर्घकाळ तरुण राहावे आणि तुमच्या आरोग्याच्या इतर समस्या दूर व्हाव्यात यासाठी पेरुची पानेही अतिशय उपयुक्त असतात. त्वचेच्या देखभालीपासून ते पोटाच्या समस्येपर्यंत अनेक गोष्टींवरील उत्तम उपाय म्हणून त्याचा उपयोग होतो.

१. मधुमेहामध्ये रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी पेरुच्या पानांचा रस अतिशय उपयुक्त असतो. एका अभ्यासानुसार हा रस नियमित घेतल्यास रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी निश्चितच उपयोगी होतो.

२. वजन कमी करण्यासाठीही पेरुची पाने उपयुक्त असतात. शरीरातील फॅटस वाढविणाऱ्या घटकांवर नियंत्रण येण्यासाठी पेरुची पाने खाल्ल्यास फायदा होतो. याचे चूर्ण घेतल्यास त्याचा फायदा होतो. त्यामुळे लठ्ठपणावरही हा एक उत्तम उपाय होऊ शकतो.

३. शरीरात विविध कारणांनी झालेल्या गाठींवरील उपाय म्हणूनही पेरुच्या पानांचा वापर केला जातो. दुखणाऱ्या गाठींवर पेरुच्या पानांची पेस्ट करुन ती लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे आलेली सूज कमी होण्यासही मदत होते.

४. काहींना अंगावरुन पांढरं जाण्याचा त्रास असतो. हे पांढरे प्रमाणात गेले तर ठिक पण ते जास्त जात असल्यास त्यावर योग्य ते उपचार करावे लागतात. पेरुची पाने या समस्येसाठीही अतिशय उपयुक्त असतात. रोज सकाळ संध्याकाळ या पानांचा रस घेतल्यास त्याचा ही समस्या कमी होण्यासाठी फायदा होतो.

५. डायरियाच्या आजारावरही पेरुची पाने उपयुक्त ठरतात. लहान मुलांना डायरिया झाल्यास त्यांना या पानांचा रस द्यावा. पोटाच्या इतरही समस्यांवर याचा उपयोग होतो. एक कप पाण्यात ही पाने टाकून ती उकळावीत. त्याचा रस गाळून तो प्यायल्यास फायदा होतो. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

६. दातांच्या समस्यांसाठीही पेरुच्या पानांची पेस्ट उपयुक्त असते. दातांच्या मजबूतीसाठी हा एक उत्तम उपाय आहे. घशाच्या समस्याही त्यामुळे दूर होतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)