22 November 2017

News Flash

मनःशांती हवीये? हे आसन करुन पाहा

नियमित करणे आवश्यक

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ | Updated: September 8, 2017 10:30 AM

भक्त ध्रुवाने या आसनात तपश्चर्या केली होती. स्थिर राहून अखंड तप करून सिद्धी मिळवली म्हणून या आसनाला ध्रुवासन असे नाव पडले. हे दंड स्थितील आसन आहे. प्रथम दोन्ही पायामध्ये थोडे अंतर घेऊन उभे रहावे. मग डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाच्या मूळ स्थानापाशी न्यावा. मग दोन्ही हातांनी नमस्कार स्थिती करावी. डोळे मिटून आसनाशी तदरूप व्हावे. पाय दुमडून वर घेताना श्वास घ्यावा. छातीपाशी हातांची नमस्कार स्थिती पूर्ण होताच एका पायावर शरीर तोलून हे आसन पूर्ण होते. आसनस्थितीत श्वास रोखून धरावा. एकदा डावीकडून व एकदा उजवीकडून हे आसन करावे. आसन सोडताना कुंभक सोडून श्वास सोडत पाय खाली न्यावा, हात खाली घ्यावे आणि संथ श्वसन करावे. आसन स्थितीत आपली दृष्टी स्थिर करून डोळे मिटून घ्यावेत किंवा अदृश्य बिंदूकडे नजर स्थिर करावी म्हणजे आसन टिकवता येईल.

कंबरदुखीसाठी हे आसन उपयुक्त

या आसनामुळे मनाला शांती लाभते. वाईट विचार दूर होतात. हाता-पायात मजबुती येते. गुडघ्यांमधून आवाज येत असेल तर हे आसन नियमित करावे, गुडघ्यांना बळकटी येते. ध्रुवासन टिकवायला अवघड असते मात्र ते दोन ते तीन मिनिटे टिकविण्याचा सराव करावा. या आसनामुळे शरीरात शक्ती आणि स्फूर्ती निर्माण होते. चंचल मनावर लगाम घालणारे आणि मनाची एकाग्रता वाढवणारे हे आसन आहे. स्त्रियांनी हे आसन जरूर करावे. त्यामुळे त्यांच्या मनातील आसुया, मत्सर इत्यादी विकारांचा नाश होण्यास मदत होते. पाण्याजवळ किंवा नदीच्या किनारी हे आसन केले असता तदरुपता चांगली येते. आत्मबल वाढून अपूर्व आनंद गवसतो. आसन नियमित केल्याने अवघडातील अवघड काम करतानाही त्रास होत नाही.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ

First Published on September 8, 2017 10:30 am

Web Title: usful yogasan for mind peace druvasan