Xiaomi कंपनीने तब्बल 30,000mAh क्षमतेची नवीन पॉवर बँक आणली आहे. याद्वारे एकाच वेळी तीन डिव्हाइस चार्ज करता येणार आहेत. विशेष म्हणजे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही पावर बँक 10 दिवसांचा बॅकअप देते असा दावा कंपनीने केला आहे.

30000mAh Mi Power Bank 3 Quick Charge Edition  मध्ये कमी पॉवरची आवश्यकता असलेले डिव्हाइस चार्ज करण्यासाठी लो-करंट मोड देण्यात आला आहे. स्मार्ट रिस्टबँड किंवा ब्लूटूथ वायरलेस इअरबड्स चार्ज करण्यासाठी या मोडचा उपयोग होईल. पॉवर बँकमधील युएसबी टाइप-सी पोर्टद्वारे 18 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह एकाचवेळी तीन डिव्हाइस चार्ज होतात. याशिवाय पॉवर बँकला जलदगतीने चार्ज करण्यासाठी युएसबी टाइप-सी 24 W मॅक्स हाय-स्पीड इनपुट सपोर्ट देखील आहे.

ही पॉवर बँक पूर्ण चार्ज करण्यासाठी 7.5 तासांचा वेळ लागतो. या पॉवर बँकद्वारे iPhone SE (2020) हा फोन जवळपास 11 वेळेस (10.5) पूर्ण चार्ज करता येईल. तर, Mi 10 आणि Redmi K30 Pro यांसारख्या फोनला जवळपास पाच वेळेस (4.5) चार्ज करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय iPhone 11 फोन केवळ1.45 तासांमध्ये पूर्ण चार्ज होईल असंही कंपनीने म्हटलं आहे.

कंपनीने ही पॉवर बँक सध्या चीनमध्ये लाँच केली असून याची किंमत 169 युआन (जवळपास 1,800 रुपये) आहे. भारतात ही बँक कधीपर्यंत लाँच केली जाईल याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. पण लवकरच भारतीय मार्केटमध्येही ही पॉवर बँक लाँच केली जाण्याची शक्यता आहे. चीनमध्ये कंपनीने या पॉवर बँकसाठी प्री-ऑर्डर घेण्यास सुरूवात केली असून 18 जूनपासून सेल सुरू होणार आहे.