एकीकडे सरकार डिजिटल इंडियाचा नारा देत असताना दुसरीकडे मात्र एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सोशल मीडिया आणि इतर गोष्टींचे लोण ग्रामीण भागात पोहोचले असताना देशात केवळ १९ टक्के लोक इंटरनेट वापरतात. यातही १५ ते ६५ या वयोगटातील लोकांचा सहभाग असतो असे या अहवालात म्हटले आहे. तर याच वयोगटातील ३५ टक्के लोकांना इंटरनेटबाबत माहिती असते असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. इंटरनेटचा वापर वाढला असे आपल्याला वाटत असले तरीही भारतात अजूनही इंटरनेटविषयी पुरेशी माहिती नाही असा निष्कर्ष यामध्ये नोंदविण्यात आला आहे.
भारतीय दूरसंचार कंपन्यांसोबत मिळून धोरण आणि नियामक म्हणून काम करणाऱ्या लर्नेशिया या थिंक टँकने हा अहवाल तयार केला आहे. भारतात ग्राहकांना परवडेल अशा दरात इंटरनेट सेवा दिली जात असूनही ती सुविधा वापरणाऱ्यांची संख्या इतकी कमी कशी याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर १५ ते ६५ वयोगटातील लोकांपैकीही इंटरनेटचा वापर करणाऱ्यांपैकी २७ टक्के लोक हे काही सर्च करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी नाही तर सोशल मीडियावर सर्फींगसाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे भारतातील ही आकडेवारी नक्कीच धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 8, 2018 7:30 pm