अपुरी झोप आरोग्यास घातक असते, हे बहुधा प्रत्येकालाच माहीत आहे. पण दीर्घकाळ झोपणाऱ्यांनाही आरोग्यासंदर्भातील दुष्परिणामांना सामोर जावे लागते. दररोज अधिक वेळ झोपणे आणि एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अशा प्रकारची असंतुलित जीवनशैली असणाऱ्यांचे आयुर्मान कमी होते, असा दावा ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी केला आहे.
मेलबर्न येथील सॅक्स संस्थेने यासंदर्भात एक अभ्यास केला. ४५ आणि त्यावरील वयोगटातील लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीचे परीक्षण त्यांनी केले. नऊ किंवा त्यापेक्षा जास्त तास झोप घेणाऱ्या, व्यायामाचा अभाव असणाऱ्या आणि दिवसभरात एकाच जागेवर बसून काम करणाऱ्या लोकांना मृत्यूचा धोका अधिक असल्याचा निष्कर्ष त्यांनी या अभ्यासाअंती काढला.
दिवसभरात सात तासांपेक्षा अधिक काळ एकाच जागी बसण्याची सवय आणि अतिशय अल्प व्यायामामुळे आठवडय़ाभरातील आयुष्याची १५० मिनिटे कमी होत असल्याचे या शास्त्रज्ञांनी निरीक्षणातून नोंदविले आहे.
‘अल्प शारीरिक श्रम असलेली मिश्रणयुक्त जीवनशैली तुम्हाला तीन पटींनी घातक परिणामांना सामोरे जाण्यास पुरेसे आहे,’ असे मत सिडनी विद्यापीठाच्या आणि संशोधनाच्या प्रमुख मेलोडी डिंग यांनी व्यक्त केले. जर आपण जोखीम वाढवणाऱ्या या घटकांचा गांभीर्याने विचार केला नाही, तर नक्कीच ही जीवनशैली शरीराला घातक ठरू शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
संशोधकांनी ‘मृत्यू आणि विविध आजार यांच्याशी निगडित जीवनशैली’ अभ्यासताना धूम्रपान, अधिक मद्यपान, अतिअल्प आहार आणि शारीरिकदृष्टय़ा अकार्यक्षम असणाऱ्यांच्या जीवनशैलीचे अवलोकन केले. त्यानंतर आलेल्या विविध प्रकारच्या निष्कर्षांतून मुत्यू होण्यासाठी कारणीभूत कारणांच्या नोंदी संशोधनातून केल्या गेल्या. याच निरीक्षणातून नियमित वेळेपेक्षा जास्त झोप, बसण्याची सवय आणि अल्प व्यायामासोबत अल्कोहल, धूम्रपान आणि सात तासांपेक्षा कमी झोप असणाऱ्यांमध्ये मुत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.
सिडनी विद्यापीठाचे प्राध्यापक अॅड्रियन बाउमन यांच्या मते, संसर्गजन्य रोगाच्या तुलनेत असंसर्गजन्य रोग म्हणजेच (हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग) जगभरातील ३८ दक्षलक्ष लोकांच्या मृत्यूला जबाबदार ठरत आहेत.