Ayurveda Tips To Consume Milk: लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण आहारात दुधाचा नक्कीच समावेश करतात. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. दूध हाडांसाठी सर्वात फायदेशीर मानले जाते, कारण त्यात भरपूर कॅल्शियम असते. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आयुर्वेदात दूध पिण्याची योग्य वेळ सांगितली आहे. आज जाणून घेऊया याविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी तज्ज्ञांकडून..
रिकाम्या पोटी दूध पिणे हानिकारक आहे का?
प्रेम रघु आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, यूपीचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अभिनव राज यांच्या मते, दूध कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये. असे केल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी नेहमी काही खाल्ल्यानंतरच दूध प्यावे. मात्र लहान मुलांच्या बाबतीत असे करणे हानिकारक नाही. लहान मुले दिवसाच्या कोणत्याही वेळी दूध पिऊ शकतात. यामुळे त्यांना दिवसभर एनर्जी मिळते आणि योग्य प्रमाणात पोषक तत्व त्यांच्या शरीरात पोहोचतात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात दूध महत्त्वाची भूमिका बजावते. पण मोठ्यांनी सकाळी दूध पिणे टाळावे.
( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब कोलेस्ट्रॉल सहज काढून टाकेल ‘हे’ फळ; कधी आणि कसे खावे जाणून घ्या)
कोणत्या वेळी दूध पिणे सर्वात फायदेशीर आहे?
डॉ.अभिनव राज सांगतात की, प्रौढांनी रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी दूध प्यावे. असे केल्याने त्यांची पचनक्रिया चांगली होते आणि अनेक आजारांपासून आराम मिळतो. तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असेल तर रात्री दूध पिणे फायदेशीर आहे. तुम्ही रात्री एक ग्लास कोमट दूध पिऊ शकता. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो आणि चांगली झोप लागते. आयुर्वेदात रात्रीची वेळ दूध पिण्यासाठी सर्वात फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. मात्र, दुपारच्या जेवणासोबत दूधही घेऊ शकता. यानेही तुमचे नुकसान होणार नाही.