चीनमधील आघाडीची मोबाइल कंपनी हुआवेई समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हुआवेई स्मार्टफोन वापरणाऱ्यांना आता फेसबुक, व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्राम प्री-इन्स्टॉल केलेलं मिळणार नाही. फेसबुकनेच हा निर्णय घेतला आहे. हुआवेईसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
अमेरिरेकडून लावण्यात आलेल्या बंदीनंतर अनेक अमेरिकी कंपन्यांनी हुआवेईसोबत आपला बिजनेस पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमक्या याचवेळी फेसबुकने ही घोषणा केली आहे. यामुळे हुआवेई स्मार्टफोनच्या विक्रीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. फेसबुकच्या या निर्णयावर अद्याप हुआवेईकडून कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.
आधीपासून हुआवेई स्मार्टफोन वापरणाऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. त्यांना याचा फटका बसणार नाही. त्यांना नेहमीप्रमाणे अॅप्स वापरता येणार असून, अपडेट्सही मिळणार आहेत अशी माहिती फेसबुकने रॉयटर्सशी बोलताना दिली आहे. पण नवीन हुआवेई स्मार्टफोन विकत घेणाऱ्यांना फेसबुक, व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्राम प्री-इन्स्टॉल मिळणार नाही.
सध्या हुआवेई स्मार्टफोन विकत घेणारे प्ले स्टोअरवरुन फेसबुक किंवा अन्य अॅप डाऊनलोड करुन वापरु शकतात. पण भविष्यात येणाऱ्या व्हर्जनमध्ये ही सोय नसेल. जोपर्यंत अमेरिका नियमात बदल करत नाही तोपर्यंत त्या स्मार्टफोन्समध्ये गुगल प्ले स्टोअरचा अॅक्सेस नसेल.
अनेक स्मार्टफोन कंपन्या आपल्या मोबाइल फोनमध्ये फेसबुकसारखे प्रसिद्ध अॅप प्री-इन्स्टॉल देत असतात. अनेक ठिकाणी हुआवेई स्मार्टफोनमध्ये ट्विटर आणि बुकिंग.कॉम हे अॅप प्री-इन्स्टॉल मिळतात. यावर ट्विटर किंवा बुकिंग.कॉमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.