जगभरातील बहुतेक लोक मांसाहारी आहेत. भारतातही मांसाहारी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पावसाळ्यात मांसाहार न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण- या मोसमात अन्नातून होणारी विषबाधा, बर्ड फ्ल्यू यासह इतर अनेक समस्या उदभवतात. अशा परिस्थितीत आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. म्हणून आरोग्याविषयी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यात पावसाळ्यात तज्ज्ञांकडूनही सीफूड किंव मासे खाऊ नयेत, असा सल्ला दिला जातो. मात्र, यामागचे कारण काय आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात सीफूड किंवा मासे का खाऊ नयेत?
मासे अतिशय पौष्टिक आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. ते संपूर्ण आरोग्यासाठी विशेषत: मेंदू, डोळे आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप फायदेशीर असतात. पण, पावसाळ्यात माशांचे सेवन केल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्याची कारणे पुढीलप्रमाणे :
१) जलप्रदूषण
पावसाच्या पाण्यामुळे अनेकदा जलप्रदूषण वाढते. कारण- पावसाचे पाणी जमिनीवरील अस्वच्छता नद्या, तलाव व समुद्रात वाहून नेते. यावेळी समुद्रातील माशांसह अनेक प्रजाती हे अस्वच्छ पाणी ग्रहण करू शकतात; ज्यामुळे त्यांच्या शरीरातही ही घाण जमा होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही समुद्रातील हे मासे सेवन केल्यास तुम्हालाही आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवू शकतात.
२) मर्करी पॉयजनिंग
पावसाळ्यात सी फूड किंवा मासे खाण्याचा आणखी एक धोका म्हणजे मर्करी पॉयजनिंग. मर्करी हा एक विषारी जड धातू आहे; जो मासे आणि इतर सीफूडच्या ऊतींमध्ये जमा होऊ शकतो, विशेषत: ट्युना, स्वॉर्ड फिश व शार्कमध्ये हा विषारी धातू जमा होतो. पावसाळ्यात मर्करीच्या पातळीत मोठे चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात मासे खाताना विशेष काळजी घ्या. हाय मर्करी लेव्हलमुळे न्यूरॉलॉजिकल समस्या उदभवू शकतात. विशेषतः गर्भवती महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो.
३) पर्यावरणीय प्रदूषक
मर्करीव्यतिरिक्त सीफूडमध्ये इतर पर्यावरणीय प्रदूषके जसे की, पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल्स (PCBs). जे माशांच्या ऊतींमध्ये जमा होऊ शकतात आणि मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतात.
४) ॲलर्जिक रिॲक्शन
काही लोकांना विशिष्ट प्रकारचे मासे किंवा सीफूड खाल्ल्याने ॲलर्जी किंवा सेन्सिटिव्हिटीचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती खूप कमकुवत असते आणि त्यामुळे ॲलर्जीचा धोका वाढतो. सीफूडमुळे होणाऱ्या ॲलर्जीची सामान्य लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात; ज्यामध्ये अंगावर पित्ताच्या गाठी उठणे, खाज सुटणे, पुरळ येणे, चेहरा, ओठ, जीभ किंवा घशाला सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा घरघर जाणवणे, ओटीपोटात दुखणे, मळमळ किंवा उलट्या यांचा समावेश आहे. अशा वेळी समस्या गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
५) पॅरासायटिक इन्फेक्शन
पावसाळ्यात पॅरासायटिक इन्फेक्शनच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होते; ज्यामुळे संक्रमण होऊ शकते. हे संक्रमण पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. यात्यामुळे सीफूड खाल्ल्यानंतर अतिसार, पोट फुगणे किंवा गॅस होऊ शकतो. त्याशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये इतर अवयवांवरही दुष्परिणाम होऊ शकतो.
पावसाळ्यात सीफूडमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय कराल?
पावसाळ्यात सीफूडमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्तम दर्जाचे ताजे मासे निवडा. तसेच कोणतेही हानिकारक बॅक्टेरिया किंवा पॅरासाइट नष्ट करण्यासाठी मासे नीट शिजवून घ्या.