Shawarma Killed People, What Precaution To Take: केरळच्या कोचीमध्ये बुधवार २५ ऑक्टोबर २०२३ ला एका २४ वर्षीय तरुणाने शहरातील हॉटेलमधील लोकप्रिय शॉवर्मा खाल्ल्यानंतर त्याला अन्नातून विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजतेय. याशिवाय चेन्नईतील एका १४ वर्षीय मुलीचा देखील अशाच प्रकारे मृत्यू झाला आहे तर इतर ४३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत तरुण राहुल डी नायर याला शॉवर्मा खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे दिसू लागली, ज्यामुळे अनेक अवयव निकामी झाले, असा त्याच्या कुटुंबीयांनी दावा केला होता. लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारपासून तो मृत्यूशी झुंज देत होता.

शॉवर्मा खाताना कोणत्या चुका साधारणतः केल्या जातात व त्यामुळे उद्भवणारा धोका कसा टाळता येईल हे आज आपण जाणून घेणार आहोत. इंडियन एक्सस्प्रेसने डॉ शुचिन बजाज, जनरल फिजिशियन आणि संस्थापक-संचालक, उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. डॉक्टर सांगतात की, शॉवर्मा हा काही मुळातच घातक किंवा विषारी पदार्थ नाही. पण तो ज्या प्रकारे तयार केला जातो, हाताळला जातो किंवा साठवला जातो त्यामुळे धोका बळावू शकतो. हा नियम सर्वच अन्नपदार्थांना लागू होतो.

“शॉवर्मा मुळे अन्न विषबाधा होण्याचे मुख्य कारण म्हणजे फ्रीजमधून साठवून ठेवण्याची पद्धत किंवा वेळ चुकल्यास अन्न दूषित होऊ शकते. दुसरे मुख्य कारण म्हणजे जर आपण यात कमी शिजवलेले मांस वापरले तरीही धोका वाढतो. योग्य मांस न वापरल्यास साल्मोनेला किंवा ई. कोली सारख्या हानिकारक जीवाणूंचा प्रवेश शरीरात होण्यास शॉवर्मा हे माध्यम ठरू शकते. फ्रीजमध्ये खूप दिवस मांस साठवून ठेवल्यास ते हानिकारक बॅक्टेरियाचे प्रजनन केंद्र बनू शकते.”

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी सांगितले की, “खाद्यपदार्थ हाताळणाऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छता पाळण्यासह भांडी व किचनची स्वच्छता राखायला हवी. शिवाय अतिप्रमाणात सॉस आणि मसाल्यांचा वापर देखील पदार्थाला दूषित करण्याचे कारण ठरू शकतो.” आता एवढं वाचल्यावर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की म्हणजे आता शॉवर्मा खाणं सुद्धा बंद करायचं का? तर इतका मोठा निर्णय घेण्याची तातडीने गरज नाही तुम्ही त्याबदल्यात काय व कशी काळजी घ्यावी हे आधी पाहून घ्या..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • स्वच्छतेची खात्री करून मगच कुठल्या ठिकाणी खायचं हे ठरवा.
  • मांस अर्धे कच्चे असेल तर असे पदार्थ खाणे टाळा. शिवाय शिजवताना योग्य तापमान आहे याचीही खात्री करा.
  • मांस योग्यरित्या शिजवण्यासाठी तापमान सामान्यतः 165°F (74°C) असते व यामध्ये हानिकारक जीवाणू नष्ट होतात.
  • खोलीच्या तपमानावर बराच काळ ठेवलेला शॉवर्मा खाणे टाळा
  • भाज्या, सॉस, चीज सुद्धा ताजे आहे का याकडे लक्ष द्या.

तुम्हाला एखाद्या विशिष्ट आरोग्य स्थितीनुसार मांस किंवा शॉवर्मामधील अन्य घटकांचे सेवन टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्यास मात्र असा धोका पत्करू नये. शिवाय खाल्ल्यावर अन्य कोणती ऍलर्जी होत नाही याकडे लक्ष द्यावे व वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.