Aishwarya Rai Bachchan Morning Routine: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. नुकतंच या अभिनेत्रीने तिच्या मॉर्निंग रुटिनबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.”सगळ्या जगासाठी दिवसात २४ तास असतात, पण आम्ही २४ तासांत ४८ तासांचं काम करायचा प्रयत्न करतो. मला वाटतं आयुष्यात इतकं काही चालू असतं की एक ठराविक पॅटर्न सांगणं शक्यच नाही. पण, एक गोष्ट नक्की आहे – माझा दिवस खूप लवकर सुरू होतो. माझा दिवस किमान सकाळी ५.३० वाजता सुरू होतो,” असं तिनं हार्पर बझारला सांगितलं.
सकाळी लवकर उठण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय सोलंकी यांच्याशी केलेल्या संवादात indianexpress.com ने हे फायदे काय आहेत ते जाणून घेतले.
झोपेची गुणवत्ता सुधारते :
नैसर्गिक प्रकाश आणि अंधाराच्या चक्रानुसार झोप घेणे तुमची झोप खोल आणि आरामदायक बनवते. लवकर झोपल्याने शरीराला REM (rapid eye movement) आणि खोल झोपेच्या टप्प्यांमध्ये जास्त वेळ मिळतो, जे शरीर आणि मनाच्या पुनर्बलासाठी खूप महत्त्वाचे असते.
ऊर्जा पातळी चांगली राहते : लवकर झोपल्याने आणि लवकर उठल्याने दिवसभर चांगली ऊर्जा मिळते. शरीराला पुरेसा आराम मिळतो, ज्यामुळे विशेषतः सकाळच्या वेळी लक्ष केंद्रित ठेवता येतं आणि सतर्क राहता येतं.
हार्मोन्सचं संतुलन सुधारतं : मेलाटोनिन हा झोपेचा हार्मोन संध्याकाळी लवकर वाढतो, त्यामुळे लवकर झोप लागते. त्याचबरोबर, सकाळी कॉर्टिसोल हार्मोनचं चांगलं नियंत्रण राहतं, ज्यामुळे उठल्यावर फ्रेश आणि जागरूक वाटतं.
मेटाबॉलिझम (पचनक्रिया) सुधारते : लवकर झोपल्याने शरीराची पचनक्रिया नीट होते आणि रात्री उशिरा लागणारी भूक कमी होते, ज्यामुळे अन्न पचवायला अडचण येत नाही. लवकर झोपल्यावर शरीर अन्न योग्यरित्या पचवून त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतं.
असं रुटिन कसं सेट करावं?
डॉ. सोलंकी यांनी सांगितलं की, रोज झोपायची आणि उठायची वेळ १५ ते ३० मिनिटांनी लवकर करत जा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या उद्दिष्ट वेळेपर्यंत पोहोचत नाही.
“सकाळी लवकर उठून व्यायाम करायची कल्पना खूप चांगली वाटते. पण, जेव्हा आपण अलार्मनुसार उठू शकत नाही, तेव्हा आपली उत्सुकता कमी होते. यावरचा चांगला उपाय म्हणजे अलार्मची वेळ रोज १५ मिनिटांनी लवकर ठेवणे. हे एक आठवडा करा आणि मग पुढे अजून वेळ लवकर करा. अशाने बदल अचानक वाटत नाही आणि शरीर हळूहळू नव्या रुटीनला जुळवून घेतं,” असं त्यांनी सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की दररोज, अगदी वीकेंडलाही, उठायची वेळ एकसारखी ठेवा – यामुळे शरीराचं आतलं घड्याळ नीट चालू राहतं.
“झोपण्याच्या आधी कॅफिन, जड जेवण किंवा व्यायाम टाळा. त्याऐवजी पुस्तक वाचा, ध्यान करा किंवा हलकं स्ट्रेचिंग करा, अशा शांत करणाऱ्या गोष्टी करा,” असं त्यांनी सांगितलं.
अनेक वैद्यकीय अभ्यास सांगतात की, उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी घेणं टाळावं, कारण तुम्हाला थोडं रिलॅक्स होणं गरजेच आहे. आपल्या शरीराला समजून घेणं आणि त्याच्या गरजा ऐकणं महत्त्वाचं आहे. जर कॉफीमुळे फ्रेश वाटत असेल, तर ठीक आहे – ती घ्या.
रात्री झोपायच्या आधी शांत आणि आरामदायक सवयी लावा, ज्यामुळे शरीराला झोपेची वेळ झाली आहे हे समजतं. यामध्ये लाईट मंद करणे, सौम्य संगीत ऐकणे किंवा गरम पाण्याने अंघोळ करणे यांचा समावेश होऊ शकतो. तज्ज्ञांनी सांगितलं की, दिवसभरात विशेषतः सकाळी नैसर्गिक प्रकाशात थोडा वेळ घालवा. यामुळे शरीराचं नैसर्गिक घड्याळ (circadian rhythm) सेट होतं, ज्यामुळे लवकर झोप येते आणि लवकर उठता येतं.