Stop Alcohol For Six Months Benefits: दारू आरोग्यास हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पण जर तुम्ही दारू पूर्णपणे सोडली, तर नक्की काय होतं? डॉ. अनिकेत मुळे (इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरा रोड) यांनी सांगितले, “जेव्हा एखादी व्यक्ती दारू सोडायचं ठरवते, तेव्हा तिला लगेचच काही चांगले फायदे दिसू लागतात आणि ते हळूहळू वाढत जातात. सहा महिने दारू न घेतल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यात खूप सकारात्मक बदल होतात. जर यकृताचं आधीच काही नुकसान झालं असेल, तर ते हळूहळू भरून येऊ लागतं आणि त्याचं काम सुधारू लागतं”.

डॉ. मुळे यांनी पुढे सांगितले, “दारू सोडल्यानंतर शरीरातील ऊर्जा स्तर (energy level) संतुलित राहतो, झोपेचा दर्जा सुधारतो आणि झोप नियमित होते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. मानसिक आरोग्यही सुधारते. माणूस कमी चिंताग्रस्त वाटतो, भावनिकदृष्ट्या संतुलित राहतो आणि कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो”.

डॉ. मुळे म्हणाले, “दारू न घेतल्याने नातेसंबंधही चांगले होऊ लागतात. कारण- संवाद सुधारतो आणि माणूस भावनिक व शारीरिकदृष्ट्या उपलब्ध राहतो. जेव्हा एखादी व्यक्ती सहा महिने दारू घेत नाही, तेव्हा त्यामध्ये असलेली मानसिक ताकद, शिस्त आणि आयुष्यात चांगले व कायमस्वरूपी बदल घडविण्याची क्षमता दिसून येते”.

डॉ. कुशल बांगड (सल्लागार डॉक्टर, एआयएमएस हॉस्पिटल, डोंबिवली) यांनी सांगितले, “दारू सोडल्यानं यकृत मजबूत होतं, मन शांत होतं, मूड सुधारतो आणि जवळच्या लोकांशी असलेलं आपलं नातं अजून घट्ट होतं. जर स्वतःसाठी नाही, तर किमान तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी दारू सोडा.

“दारूमुळे केवळ यकृताचा कर्करोगच नाही, तर हृदयविकार, उच्च रक्तदाब, स्ट्रोक, पचनाच्या तक्रारी आणि मेंदूचं नुकसान होऊ शकतं. त्याशिवाय तणाव, नैराश्य आणि तोंड, घसा व स्तनाचा कर्करोग यांचा धोका वाढतो. त्यामुळे दारू त्वरित सोडणं आणि आयुष्याचा दर्जा सुधारणं हेच योग्य आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. मुळे म्हणाले, “दारू सोडल्यानं माणूस स्पष्ट व चांगल्या पद्धतीनं विचार करू शकतो आणि तो आयुष्य अर्थपूर्ण जगू शकतो. सहा महिने दारू न घेणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो केवळ तुम्हालाच नाही, तर तुमच्याभोवतालच्या लोकांनाही प्रेरणा देऊ शकतो आणि तेही या निर्णयावर ठाम राहू शकतात.”