झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शांत झोपेसाठी लोक अनेकविध प्रयत्न करताना दिसतात. कोणी योगा करते, कोणी ध्यान करते, तर कोणी आहारामध्ये बदल करते. अनेकदा आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काही लोकांना झोपताना पायांमध्ये उशी ठेवून झोपण्याची सवय असते; पण त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? पायांत उशी ठेवल्यास पाठीच्या कण्याला आधार मिळाल्याने तो सरळ राहतो आणि पाठीच्या खालच्या भागावर व कंबरेवरील ताण कमी होऊन आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात.

पायात उशी न ठेवल्यास काय होते?

जेव्हा तुम्ही तुमच्या कुशीवर झोपता तेव्हा वरचा पाय पुढे सरकतो आणि गादीवर टेकतो. त्यामुळे पेल्विस (ओटीपोटात खालच्या आणि मांडीदरम्यानची हाडे जी मणक्याला पायांशी जोडतात तो भाग) आणि खालचा मणका त्यानुसार वळतो (Twist). असे चुकीच्या पद्धतीने झोपल्याने कंबरेच्या भागात, आजूबाजूच्या स्नायूंवर आणि संयोजी उतींवर (connective tissues) अनावश्यक दबाव येऊ शकतो,” असे गुरुग्राममधील पारस हेल्थच्या अंतर्गत औषध विभागाचे प्रमुख डॉ. आर. आर. दत्ता यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

पायात उशी ठेवल्यास काय होते?

त्यांनी स्पष्ट केले, “तुमच्या पायांच्या मधोमध उशी ठेवल्याने मणक्याच्या नैसर्गिक वक्रतेला आधार मिळतो, ज्यामुळे तुमची कंबर, पेल्विस व गुडघे सरळ राहण्यास मदत होते. त्यामुळे स्नायूंवरील ताण कमी होतो आणि सायटिकासारख्या आजारांना प्रतिबंध होतो, जिथे पाठीच्या खालच्या भागातील नसा दबल्याने पायांमध्ये वेदना तीव्र होतात. त्याव्यतिरिक्त पायांत उशी ठेवल्याने गुडघ्यांमधील थेट संपर्क कमी होतो आणि कूर्चावरील (दोन हाडांच्या किंवा सांध्यांच्या मध्ये असलेली एक गादी (ऊती) झीज कमी करून सांध्याचे आरोग्य सुधारते. तसेच ही पद्धत शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरण वाढवू शकते, ज्यामुळे चुकीच्या पद्धतीने झोपण्यामुळे शरीराच्या विशिष्ट भागांवर येणारा ताण कमी होतो आणि रक्तवाहिन्यांमधून हृदयाकडे परत जाणारा रक्त प्रवाह सुधारतो”

पायात उशी ठेवण्याबाबत संशोधन काय सांगतात?

या पद्धतीवरील थेट अभ्यास मर्यादित प्रमाणात असले तरी, संबंधित संशोधन त्याच्या फायद्यांना समर्थन देते. “द स्पाइन जर्नल आणि द जर्नल ऑफ व्हॅस्क्युलर सर्जरीमधील अभ्यास मणक्याचे आरोग्य आणि रक्तवाहिन्यांमधून हृदयाकडे परत जाण्याचा प्रवाह सुधारण्यासाठी योग्य झोपण्याची स्थिती आणि पायांची उंची यांचे महत्त्व अधोरेखित करतात,” असे डॉ. दीपक कुमार महाराणा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. ते हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल, व्हॅस्क्युलर आणि एंडो व्हॅस्क्युलर सर्जन आणि वरिष्ठ सल्लागार आहेत.

पायात उशी ठेवून झोपण्याचे फायदे

डॉ. दत्ता यांनी सांगितले, “संधिवात(arthritis,), हर्निएटेड डिस्क (herniated discs) किंवा कंबरदुखीसारख्या (hip pain) दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींसाठी पायांमध्ये उशी ठेवण्यासारखी साधी गोष्ट वेदना कमी करण्यास, योग्य पद्धतीने झोपण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते. “कालांतराने अशा पद्धती दीर्घकालीन वेदना आणि मस्क्युकोस्केलेटल असंतुलनाचा (musculoskeletal imbalances) धोका कमी करण्यास मदत करू शकतात. एका कुशीवर झोपणाऱ्या व्यक्ती आणि पाठीच्या कण्याचे उत्तम आरोग्य मिळवणारे या दोहोंसाठी विशेषत: या पद्धतीची शिफारस केली जाते.”

ही पद्धत का अवलंबावी?

पाठीचा कणा सरळ ठेवते : पायांमध्ये उशी ठेवण्याची कृती तुमची कंबर, पेल्विस आणि पाठीचा खालचा भाग सरळ रेषेत ठेवते, ज्यामुळे स्नायू आणि सांध्यावरील ताण कमी होतो. ही कृती कडकपणा किंवा वेदना टाळते. विशेषतः पाठीच्या दुखण्याच्या समस्या आणि सायटिकासारख्या समस्यांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे.

सांध्यांवरील दाब कमी करते : उशी गुडघे आणि घोट्यांवरील दाब कमी करते, त्यांना वेगळे ठेवते, ज्यामुळे घर्षण आणि अस्वस्थता कमी होते. हेी बाब विशेषतः संधिवात किंवा सांधेदुखी असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे. कारण- त्यामुळे आराम मिळू शकतो.

रक्ताभिसरणात सुधारणा : पायांमध्ये उशी ठेवल्याने त्यांतील उंची वाढते आणि ते सरळ रेषेत राहिल्याने रक्ताभिसरण सुधारते; ज्यामुळे शरीराच्या खालच्या भागातील नसा दबल्या जाणे टाळता येते. महाराणा यांच्या मते, ही गोष्ट विशेषतः व्हेरिकोज व्हेन्स असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. कारण- त्यामुळे दाब, सूज आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत मिळते. असे करण्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि अधिक आरामदायी झोप घेता येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.