How a Borderline Cholesterol Led to Heart Attack: हृदयाचे आजार हे सध्या खूपच लहान वयात मोठ्या समस्येचं कारण ठरत आहेत. अगदी ८ किंवा १० वर्षांच्या मुलांनाही हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं आहे. याला नेमकं काय कारण असं शकतं याबाबत वेळोवेळी तज्ज्ञ सावध करत असतात. अनुवांशिक असेल, ताणतणाव असेल किंवा आहार अशी अनेक कारणं असतात. जेव्हा तुमच्या कुटुंबात लहान वयात हृदयविकाराचा झटका येण्याचा इतिहास असतो, तेव्हा तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयरोगासाठी इतर कारणीभूत असणारे घटक अनुवांशिकरित्या मिळू शकतात.

“काही रूग्णांना फॅमिलिअल हायपरकोलेस्टेरोलेमिया असतो, हा एक अनुवांशिक विकार असतो ज्यामध्ये तुमचे शरीर तुमच्या रक्तातून एलडीएल कोलेस्ट्रॉल प्रभावीपणे काढून टाकू शकत नाही. त्यामुळे रक्तप्रवाहात ते जमा होते, अशी माहिती बंगळुरूमधील हॉस्पिटलमधील प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. रंजन शेट्टी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. एकूण कोलेस्ट्रॉल म्हणजे कमी घनतेचे लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्ट्रॉल, उच्च घनतेचे लिपोप्रोटीन (एचडीएल) किंवा चांगले कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स किंवा जास्त कॅलरीजपासून मिळणारे रक्तातील चरबी यांचे मिश्रण.

कोलेस्ट्रॉलवर लक्ष ठेवणे का गरजेचे?

शरीरात कोलेस्ट्रॉल धोकादायक पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. प्लेक तयार होण्यास साधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या बालपणापासूनच सुरूवात होते. अंदाजे १० वर्षांपासून ही प्रक्रिया होत असते. प्रत्यक्षात तुम्हाला लाइफस्टाइलमधील सुधारणांसह स्वत:ला सुधारण्यासाठी वेळ मिळतो. एकदा ते उच्च पातळीपर्यंत पोहोचले की ते कमी करण्यासाठी तुम्हाला औषधांची आवश्यकता पडेल असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले. त्यांची एक पेशंट जिला ३५व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला ती सांगते की, “मला कोलेस्ट्रॉल आणि माझ्या कुटुंबाच्या मेडिकल हिस्ट्रीबाबत माहिती असती तर कदाचित मी माझा हृदयविकार रोखू शकले असते.”

तरूणांनी कोलेस्ट्रॉल चाचणी कधी करावी?

डॉ. शेट्टी यांनी याबाबत सांगितले की, १८ ते २१ वयोगटातील मुलांनी त्यांचे कोलेस्ट्रॉल तपासले पाहिजे. ज्या मुलांना लहानपणापासून लठ्ठपणा किंवा मधुमेह या समस्या आहेत, त्यांची तपासणी निमितपणे करून घ्यावी. ज्यांना कौटुंबिक इतिहास किंवा इतर संबंधित आजार आहेत, त्यांनी दरवर्षी तपासणी करून घ्यावी.

कोलेस्ट्रॉल चाचणीतले आकडे नेमकं काय सांगतात?

भारतीयांना इतर लोकसंख्येच्या तुलनेत १० वर्षांआधीच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असल्याने आणि त्यापैकी ३१ टक्के लोकांमध्ये उच्च एलडीएल वाईट कोलेस्ट्रॉल आहे, तर अनुवांशिकदृष्ट्या कमी एचडीएल चांगले कोलेस्ट्रॉल होण्याची शक्यता असल्याने तपासणी आणि संतुलन खूप चांगले कॅलिब्रेट केले पाहिजे, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.

म्हणूनच एलडीएल आदर्शपणे ७० मिलीग्राम/डीएलपेक्षा कमी असले पाहिजे तर किमान एचडीएल ४० मिलिग्राम /डीएलपेक्षा कमी नसावे. ट्रायग्लिसराइड्स १५० मिलीग्राम /डीएल पेक्षा कमी असले पाहिजेत. त्याचवेळी रक्तातील साखर आणि रक्तदाब यासारख्या हृदयाच्या आरोग्याच्या इतर घटकांची तपासणी आणि संतुलन राखा.

प्रतिबंधात्मक उपाय काय?

जास्त वेळ बसून काम केल्याने शारीरिक हालचाल मर्यादित होते. तर कामाच्या ताणामुळे सोयीस्कर पदार्थ ज्यामध्ये फॅट असते ते खाण्याची इच्छा जास्त होते. अनियमित आहार आणि कमी व्यायाम यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणजे कमी चरबीयुक्त, कमी कॅलरीयुक्त पदार्थ खावेत. अधिक फळे, भाज्यांचे सॅलड याचा आहारात समावेश करावा. कारण त्यातील विरघळणारे तंतू पचनसंस्थेतील कोलेस्ट्रॉलशी बांधले जातात आणि ते शरीरातून काढून टाकतात. बदाम, अक्रोड आणि जवस याचं सेवन करावं कारण यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते.

तसंच यासाठी तरूणांना स्ट्रेंथ ट्रेनिंगचा सल्लाही दिला जातो. कामाच्या ठिकाणी शक्य असल्यास पाच मिनिटे स्क्वॅट्स आणि फप्फुसांसाठी व्यायाम करावा. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते.