जम्मूमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काम करणारे रविंदर सुस यांना वयाच्या चाळिशीत चक्कर येणे, दृष्टी अंधुक होणे व वारंवार लघवी होणे, असे त्रास होत होते. तपासणीत रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे दिसून आले. परंतु, ते एक खेळाडू असल्याने आणि त्यांच्या कुटुंबाचा कोणताही डायबेटीसचा इतिहास नसल्याने, त्यांना वाटले की, ते व्यायाम करून, आहारातील साखर मर्यादित करून आणि कारल्याच्या रसासारखी हर्बल सप्लिमेंट्स पिऊन त्याचे प्रमाण कमी करू शकतो. त्याचमुळे त्यांनी कोणतीही तपासणी केली नाही, औषधांकडे दुर्लक्ष केले. मात्र, जवळजवळ २० वर्षांनंतर एके दिवशी अचानक त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे ते कोसळले आणि त्यांना त्वरित मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यास सांगितले गेले.”त्यावेळी मी खूप मोठी चूक केली, जर मी आधी इतका शिस्तबद्ध असतो, तर गोष्टी इतक्या टोकाला पोहोचल्या नसत्या,” असे रविंदर सुस म्हणतात.

दीर्घकाळापर्यंत अनियंत्रित मधुमेहामुळे गंभीर आरोग्य गुंतागुंत निर्माण होऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण शरीरातील विविध अवयव आणि प्रणालींवर परिणाम होतो. हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतूंचे नुकसान व पायांच्या समस्यांचा धोका वाढतो. तरीही भारतातील अनेक वृद्ध व प्रौढ व्यक्ती त्यांच्या मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष करतात, हे द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमधील ताज्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, २०१९ मध्ये मधुमेह असलेल्या पाचपैकी दोन जणांना (किंवा ४० टक्के) त्यांच्या स्थितीबद्दल माहिती नव्हती. भारतात ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पाचपैकी किमान एकाला मधुमेह होता म्हणजेच ५०.४ दशलक्ष व्यक्ती. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबई येथील प्राध्यापक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. टी. व्ही. शेखर म्हणतात, “बाधित लोकांपैकी फक्त अर्धेच त्यांच्या स्थितीबद्दल जागरूक आहेत.”

पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल्समधील वरिष्ठ नेफ्रॉलॉजिस्ट व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. तरुण जेलोका यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. तरुण जेलोका म्हणतात की, त्यांनी रविंदर सुस यांच्यामध्ये जे पाहिले, ते असामान्य नाही. “मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होण्याचे सर्वांत सामान्य कारण आहे,” ते पुढे म्हणतात.

मधुमेहाचे निदान झाल्यानंतरही, रविंदर सुस यांनी सुरुवातीची लक्षणं ओळखण्यास नकार दिला. रविंदर सुस म्हणतात, “मी एक उत्साही क्रिकेटपटू होतो. राज्यस्तरीय टेबल टेनिस खेळाडू होतो आणि कुटुंबाचा कोणताही इतिहास नसल्यामुळे मला वाटले की, मी योग्य आहाराने माझ्या रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचे सल्ले आणि चाचण्यांकडे दुर्लक्ष केले,” बँकेत मुख्य व्यवस्थापक असताना, कामाचा ताण वाढल्याने जास्त वेळ बसून राहणे आणि शारीरिक हालचाली कमी झाल्या. त्यामुळे वजन ८५ किलोने वाढले. तरीही त्यांनी कधीही स्वतःची तपासणी केली नाही. मात्र, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते या भीतीने, त्यांनी त्यांच्या जेवणात कारल्याचा रस आणि मेथी पावडर मिसळून प्यायला सुरुवात केली. “मी अधूनमधून चालत होतो; पण माझ्या जीवनशैलीत कोणताही मोठा बदल झाला नाही”, सुस म्हणतात.

डॉ. जेलोका सांगतात की, जास्त धूम्रपान करणाऱ्यांना टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, धूम्रपान करणाऱ्यांना धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत मधुमेह होण्याची शक्यता ३०-४० टक्के जास्त असते. धूम्रपान तुमच्या शरीराच्या इन्सुलिन वापरण्याच्या पद्धतीत व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता येते. त्यामुळे जळजळ होऊ शकते आणि पेशींचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे ते इन्सुलिनला कमी प्रतिसाद देतात. धूम्रपानामुळे पोटाची चरबी वाढू शकते, जो मधुमेहाचा आणखी एक जोखीम घटक आहे. डॉ. जेलोका पुढे म्हणतात, “जर तुम्हाला आधीच मधुमेह असेल, तर धूम्रपान केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे कठीण होते आणि मज्जातंतूंचे नुकसान (न्यूरोपॅथी), मूत्रपिंडाच्या समस्या (नेफ्रोपॅथी) व डोळ्यांच्या समस्या (रेटिनोपॅथी)सारख्या गुंतागुंती वाढू शकतात,”

मधुमेहांच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

मधुमेहाच्या व्यवस्थापनातील आव्हान म्हणजे नियमित देखरेख, सतत व्यायाम, निरोगी आहार व औषधे यांची आवश्यकता. पायांना सूज येणे, लघवीची वारंवारिता वाढणे, भूक न लागणे, थकवा येणे इत्यादी ताणलेल्या मूत्रपिंडाच्या सूक्ष्म लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे गंभीर परिणामांना ओढवून घेण्यासारखे आहे.

एका दिवशी सर्व अचानक बिघडलं

२०१६ मध्ये सुस निवृत्त झाले आणि त्यांची पत्नी अंजलीसह त्यांच्या मुलांसोबत राहण्यासाठी ते पुण्याला गेले. नियमित चाचणीत रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे दिसून आले. त्याला इतर कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या नसल्यामुळे दुसऱ्यांदा त्यांनी दुर्लक्ष केले. दोन वर्षांनंतर २०१८ मध्ये सुस एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कोसळले. त्यानंतर तपासणीत असे दिसून आले की, त्याच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे खराब झाल्या होत्या. “त्या वेळी मी ६२ वर्षांचा होतो. निवृत्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी तयार होतो. सामान्य क्रिएटिनिन पातळी साधारणपणे ०.७ ते १.३ मिलीग्राम/डीएलदरम्यान असते परंतु माझी पातळी ८ पर्यंत वाढली होती, जी मूत्रपिंडाची स्थिती गंभीरपणे बिघडल्याचे दर्शवते,” सुस सांगतात.

”दोन्ही किडन्या खराब झाल्यानंतर त्यांची पत्नी अंजली त्यांची किडनी दाता बनली; मात्र हे सोपे नव्हते. किडनी काढण्यासाठी अंजली यांची बरगडी कापावी लागली. शस्त्रक्रियेतून बरी होण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागला,” असे सुस म्हणतात. ज्यांना प्रत्यारोपणानंतर ४० टाके घालावे लागले. कोणताही संसर्ग टाळण्यासाठी तो काही काळ आयसोलेशनमध्ये राहिला आणि नंतर दररोज चार इन्सुलिन इंजेक्शन घेऊन प्रत्यारोपणामुळे होणारा मधुमेह रोखावा लागला. “प्रत्यारोपणानंतर मधुमेहींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असते आणि त्यांना देखरेखीची आवश्यकता असते. प्रत्यारोपणाच्या सुमारे २० टक्के रुग्णांना मधुमेह होऊ शकतो,” असे डॉ. जेलोका म्हणतात.

“मी माझी कहाणी शेअर करण्याचे ठरवले, जेणेकरून मधुमेहाचे नवीन निदान झालेले किंवा या विकाराचा धोका असलेल्या कोणीही माझ्यासारखी चूक करू नये. मधुमेहाला हलक्यात घेतल्यास काय होऊ शकते आणि शिस्त व काळजीने त्याचे व्यवस्थापन केल्यास अविश्वसनीय परिवर्तन शक्य आहे हे रविंदर सुस यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.