Doctor claims threading raises hepatitis risk: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये, एमबीबीएस डॉ. आदितीज धामिजा हे सांगत आहेत की, आयब्रोज करण्यासाठी पार्लरमध्ये नियमित गेल्याने हेपॅटायटिस होण्याच्या शक्यतेमुळे लिव्हर निकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, जसे एका २८ वर्षीय महिलेच्या बाबतीत घडले. ती नियमितपणे आयब्रोज करायला जात होती; पण पुढे तिचे यकृत निकामी होऊ लागले. २८ वर्षांची महिला थकवा, मळमळ आणि डोळे पिवळे पडू लागल्यानं रुग्णालयात आली. यावेळी चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, तिचे लिव्हर व्यवस्थित काम करत नाहीये. यामागचं कारण अल्कोहोल किंवा औषधे नव्हे, तर ब्युटी पार्लरमध्ये झालेला निष्काळजीपणा त्याला कारणीभूत आहे. आयब्रोज करताना पुन्हा पुन्हा तोच धागा वापरण्यात आला. त्यामुळे त्वचेवर सूक्ष्म जखमा झाल्या आणि त्याद्वारे हेपॅटायटिस बी किंवा सी विषाणूंनी तिच्या रक्तप्रवाहात प्रवेश केला,” असे डॉ. धामिजा यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केले आहे
आयब्रोज चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात, जी सामान्यतः भुवयांना आकार देण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वापरली जाते. पण, यामुळे लिव्हर निकामी होऊ शकते का? ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे अंतर्गत औषध संचालक डॉ. अमित सराफ यांनी या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टर म्हणतात की, थ्रेडिंगमुळे लिव्हर निकामी होत नाही, परंतु स्वच्छता न पाळता केल्यास हेपॅटायटिस बी आणि सी संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.
हेपॅटायटिस बी आणि सी हे रक्तातून पसरणारे विषाणू आहेत, जे रक्ताद्वारे संक्रमित होतात. जर तुम्हाला आयब्रोज करताना धाग्याने कापलं तर एक छोटासा कट किंवा ओरखडा झाला तर ते संक्रमित रक्ताच्या प्रवेशद्वाराचे काम करू शकते. आधी वापरलेले धागे, अस्वच्छ हात सर्व विषाणू संक्रमित करू शकतात. ते हळूहळू लिव्हरला गंभीर नुकसान पोहोचवू शकते आणि काही प्रकरणांमध्ये, सिरोसिस किंवा लिव्हर निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकते. “थोडक्यात, थ्रेडिंग स्वतःच लिव्हरसाठी धोकादायक नाही, परंतु स्वच्छतेच्या पद्धतींवर अवलंबून आहे की ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते की नाही,” असे डॉ. सराफ म्हणाले.
तुम्ही काय लक्षात ठेवावे?
नेहमी स्वच्छ ठिकाणी, चांगल्या पार्लरमध्ये थ्रेडिंग करा. “नवीन, डिस्पोजेबल धागा वापरणे, हात धुणे आणि प्रक्रियेपूर्वी व नंतर त्या भागाचे निर्जंतुकीकरण करणे हे सोपे, पण मूलभूत उपाय आहेत. त्या भागात कोणतीही जखम झाल्यास थ्रेडिंग टाळणेदेखील शहाणपणाचे आहे,” असे डॉ. सराफ म्हणाले.
नियमित आयब्रोज करणाऱ्या महिलांनी संभाव्य धोक्यांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे आणि योग्य ती काळजी घेतली पाहिजे.