5 People Who Should Avoid eating Chia Seeds : दिसायला लहान असणाऱ्या या चिया सीड्स खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी फायदेशीर ठरतात, त्यामुळे चिया सीड्स खाल्ल्यास असंख्य लाभ मिळतील असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. चिया सीड्स फायबरने समृद्ध असतात; ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते, दररोज नीट पोट साफ होण्यासाठी मदत होते. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि ऊर्जा वाढवणारे पोषक घटकदेखील भरपूर असतात; ज्यामुळे तुम्हाला सतत भूक लागत नाही आणि थोडंसं खाल्ले तरीही समाधानाची भावना प्रदान करतात. रिकाम्या पोटी चिया सीड्स खाल्ल्यास पचनास मदत होते आणि चयापचय वाढू शकते.

पण, एवढे सगळे फायदे शरीराला होतात म्हणून सगळ्यांनी चिया सीड्सचे सेवन करू नये. बेंगळुरू येथील फोर्टिस हॉस्पिटलचे सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांच्या मते, पाच प्रकारच्या लोकांनी चिया सीड्स खाताना सावधगिरी बाळगली पाहिजे…

१. गॅस, पोटफुगी किंवा पचनाच्या समस्या – चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यातच जर जास्त प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी चिया सीड्स खाल्ल्यास पोटफुगी तर कधी अस्वस्थतासुद्धा निर्माण होऊ शकते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून हळूहळू सुरुवात करा आणि तुमचे शरीर कसे प्रतिसाद देते याकडे लक्ष द्या, असे डॉक्टर म्हणतात.

२. कमी रक्तदाब – चिया सीड्समध्ये नैसर्गिकरित्या अल्फा लिनोलिक ॲसिड आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे तुमचा रक्तदाब कमी करते आणि तुम्हाला चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू देऊ शकते.

३. किडनीचा त्रास – चिया सीड्समध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम असते, जे जास्त प्रमाणात सुरक्षित नसतात; त्यामुळे बहुतेक लोकांसाठी, १ ते २ चमचे पुरेसे आहेत, त्यामुळे पोटाच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या.

४. तुम्ही रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेत आहात का?

जर उत्तर हो असेल तर चिया सीड्समध्ये जास्त प्रमाणात ओमेगा-३ असते, त्यामुळे तुम्ही चिया सीड्स खाल्ल्यास जखम झाल्यावर रक्तस्त्राव जास्त प्रमाणात वाढू शकतो.

५. तुम्हाला तीळ, मोहरी किंवा अळशीच्या बियांची अ‍ॅलर्जी आहे का?

उत्तर हो असेल तर, चिया सीड्स खाल्ल्यावर लालसरपणा, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात; त्यामुळे या लक्षणांकडे लक्ष ठेवा.

डॉक्टर श्रीनिवासन म्हणतात की, चिया सीड्स आपल्याला साल्व्हिया हिस्पॅनिका या वनस्पतीपासून मिळतात आणि त्यांच्यात पाणी शोषण्याची ताकद असते. चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर असतात, ज्यामुळे पाण्यात भिजवल्यावर स्वतःच्या वजनाच्या १० ते १२ पट पाणी शोषून घेतात आणि जेलसारखा घट्ट पदार्थ तयार होतो. म्यूसिलेज ही एक नैसर्गिक पॉलिसेकेराइडमुळे होणारी जेल निर्मिती आहे, जी शरीरात पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते आणि आतड्यांची हालचाल सुधारते.

म्युसिलेज हा पदार्थ बियांच्या बाहेरील आवरणात असतो. जेव्हा बिया पाण्यात भिजवल्या जातात, तेव्हा हा पदार्थ जाडसर जेलसारखा बनतो. हे जेल तयार होण्याचं कारण म्हणजे पाण्याचे रेणू आणि म्यूसिलेजमधील घटक यांच्यात होणारी क्रिया. या प्रक्रियेमुळे बिया फुगतात आणि पाणी घट्ट, चिकट होते.

त्यामुळे डॉक्टर सल्ला देतात की, सुरुवातीला दररोज फक्त एक चमचा चिया सीड्सचे सेवन करावे आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे पचनसंस्था तुम्ही केलेल्या बदलांना प्रतिसाद देईल, त्यामुळे तुमच्या शरीराचे ऐका. जर पोटात त्रास, अस्वस्थता किंवा गिळताना अडचण वाटली तर लगेच त्या क्षणी सेवन थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.