Eating Egg Yolk increases Heart Attack Risk: ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ अशी एक जाहिरात पूर्वी आपण पाहिली असेलच. कारण अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते प्रथिने, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक चांगला आणि स्वस्त स्त्रोत आहे. असं असताना अंड्यांबाबत लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. त्याही अंड्याच्या पिवळ्या भागाबाबतही गैरसमज आहेत. अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो असे अनेकांना वाटते. मात्र यात काही तथ्य आहे की नाही… याबाबत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वात्सल्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

तज्ज्ञ सांगतात की, अनेक लोकांचा असा समज आहे की अंड्यातील पिवळा भाग हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत असू शकतो. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. एका अंड्यामध्ये अंदाजे ६ ग्रॅम प्रथिने असतात, यापैकी ४० टक्के प्रथिने अंड्यातील पिवळ्या भागापासून येतात. शिवाय अंड्यातील पिवळ्या भागामध्ये मेंदू , लिव्हर, स्नायू, हाडे आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असलेले असंख्य पोषक घटक असतात.

तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, अंड्यातील पिवळ्या भागामध्ये कोलीन नावाचा पदार्थ असतो, जो मेंदू आणि लिव्हरसाठी आवश्यक असतो. त्यात असे घटकदेखील असतात जे स्क्रीन टाइममुळे होणाऱ्या ताणापासून डोळ्यांचे रक्षण करतात. अंड्यातील पिवळ्या भागामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी असते, जे दुधातही सहजासहजी आढळत नाही.

अंड्याचा पिवळा भाग की पांढरा भाग फायदेशीर?

तज्ज्ञ सांगतात की, अंड्याचा पांढरा भाग हा लीन प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. त्यात कॅलरीज कमी आहेत आणि त्यात फॅटही कमी आहे. त्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. असं असतानाही त्यात सूक्ष्म पोषक घटक जवळजवळ नसतात. त्यामुळे तुम्हाला फक्त प्रथिने हवी आहेत की संपूर्ण सुपरफूडची गरज आहे याचा विचार आधी करा.

दररोज किती अंडी खावीत?

अंड्यांबाबत आणखी एक समज म्हणजे दररोज किती अंडी खावीत. तज्ज्ञ सांगतात की, निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी दररोज १ ते २ अंडी खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. ते पोषणाचा एक चांगला स्त्रोत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.