Sonali Bendre Early Dinner Habit : तुम्ही रात्री किती वाजता जेवता, असा प्रश्न तुम्हाला विचारला तर “आम्ही तर १०, १०:३० ला जेवतो” असे अनेक जण सहजपणे उत्तर देऊन जातात. कितीही ठरवलं तरी आयत्या वेळी येणारी मीटिंग, काम, किंवा अगदी मित्र-मैत्रिणींचे प्लॅन कशा ना कशामुळे तरी रोज रात्रीच्या जेवणासाठी तुम्हालाही उशीर होतोच ना. पण, उशिरा जेवण्याचा आपल्या आरोग्यावरही तितकाच विपरीत परिणाम होतो. अनेक अभिनेत्री आणि डॉक्टर वा तज्ज्ञसुद्धा रात्री ८ ऐवजी संध्याकाळी ७ पर्यंत जेवण्याचा सल्ला देतात. कारण- त्यामुळे ३ मोठे आजार होण्यापासून आपण स्वतःला नकळत वाचवू शकतो. अलीकडेच अभिनेत्री सोनाली बेंद्रेनेसुद्धा तिच्या दिनचर्येबद्दल सांगताना हीच गोष्ट अधोरेखित केली आणि डॉक्टरांनीही त्यावर त्यांचे मत मांडले आहे.

फराह खान अलीकडेच सोनाली बेंद्रेच्या घरी गेली होती. त्यादरम्यान ती सोनाली आणि तिच्या सासूशी गप्पा मारत, मासे तळत असताना सोनालीने तिच्या दिनचर्येबद्दल सांगितले. सोनाली यांचे पंजाबी घरात लग्न झाल्यामुळे दररोज जेवणात भरपूर पदार्थ असायचे. सोनाली महाराष्ट्रीयन असल्यामुळे डाळ आणि भात, असाच तिचा आहार असायचा. पण, पंजाबी लोकांचे जेवणातील पदार्थ पाहून कोणाच्या तरी लग्नाला आलोय की काय, असे तिला नेहमी वाटायचे. पण, पुढे सोनाली बेंद्रेने सासू मधू रमेश बहलचे कौतुक करीत सांगितले की, स्वयंपाक रोज न करण्याबाबत तिची सासू ठाम असायची. फक्त स्वयंपाकघर कसे नीट सांभाळायचे याबद्दल माहिती असणे पुरेसे आहे एवढंच तिची सासू म्हणायची, असे तिने सांगितले आहे. सोनाली बेंद्रे म्हणाली की, संध्याकाळी ६:३० ते ७ दरम्यान जेवणे ती पसंत करते. त्यानंतर जे जेवतात, त्यांच्याबरोबर मला दुर्दैवाने बसावे लागते.

संभाषणादरम्यान तिने २०१८ मध्ये कर्करोगाचे निदान झाल्यानंतर २०२१ मध्ये कर्करोगमुक्त होण्यावरही चर्चा केली. सोनालीला वाटले होते की, तिच्याकडे पुरेसा वेळ नाही आहे. पण, सुरुवातीला लक्षणे आढळली तेव्हा तिने तपासणी केली. त्यामुळे वेळच्या वेळी स्कॅन आणि चाचण्या करणे महत्त्वाचे आहे, असे तिने आवर्जून म्हटले आहे.

…तर सोनाली बेंद्रेप्रमाणे लवकर जेवल्याने तुम्हाला कसा फायदा होईल?

झांद्रा हेल्थकेअरमधील मधुमेह आणि वजन कमी करण्यास मदत करणारे तज्ज्ञ व रंग दे नीला इनिशिएटिव्हचे सह-संस्थापक डॉक्टर राजीव कोविल यांनी स्पष्ट केले की, रात्रीचे जेवण रक्तातील साखर नियंत्रणावर लक्षणीय परिणाम करू शकते. झोपण्यापूर्वी पचन आणि इन्सुलिनच्या कृतीसाठी जास्त वेळ मिळतो, ज्यामुळे रात्रीच्या ग्लुकोजच्या वाढीचे प्रमाण कमी होते. लवकर आणि हलके जेवण जेवल्याने झोप सुधारू शकते; जे चयापचयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

संध्याकाळी लवकर जेवल्याने तुमच्या खाण्याच्या पद्धती तुमच्या शरीराच्या नैसर्गिक चक्रांशी जुळतात, ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब व चयापचय सिंड्रोमचा धोका कमी होतो. तसेच जेवणाची वेळ रात्रीऐवजी संध्याकाळमध्ये बदलल्याने जास्त कॅलरीज मिळतात आणि मध्यरात्री भूकसुद्धा लागत नाही. त्यामुळे चांगले निर्णय घेण्याची आणि योग्य त्या प्रमाणात जेवण केले जाण्याची शक्यता वाढते, असे डॉक्टर कोविल यांनी सांगितले.