Orange In Vitamin C as a Cure For Cold: सर्दी- खोकला व तापाचे रुग्ण थंडीत वाढतात हा एक समज असला तरी काहींना बारमाही सर्दी असतेच. यावर उपाय म्हणून कित्येक प्रकारची औषधे- गोळ्या, आयुर्वेदिक, होमॅपॅथिक उपचार करून पाहिले तरी काही वेळा सर्दीपासून सुटका मिळत नाहीच. अशा व्यक्तींसाठी व्हिटॅमिन सी हा तारणहार ठरू शकतो असे सांगितले जाते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व विशेषतः सर्दीवर उपाय म्हणून ‘व्हिटॅमिन सी’ला महत्त्व दिले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात येणारी संत्री, व्हिटॅमिन सी चा मुबलक साठा असणारे फळ आहे. पण मुळात व्हिटॅमिन सी खरोखरच सर्दी थांबवू शकते का? संत्री ही गोळ्या- औषधांपेक्षा परिणामकारक ठरू शकतात का? याविषयी आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

डॉ राकेश गुप्ता, वरिष्ठ सल्लागार, इंटरनल मेडिसिन, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, व्हिटॅमिन सी, वैज्ञानिकदृष्ट्या एस्कॉर्बिक ऍसिड म्हणून ओळखले जाते, शरीराच्या प्रतिकारशक्तीच्या कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे एक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते, मुक्त रॅडिकल्स नष्ट करते जे अन्यथा पेशींना हानी पोहोचवू शकते आणि रोगप्रतिकारक प्रतिक्रिया कमी करू शकते. याव्यतिरिक्त, हे जीवनसत्व पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते, ज्या सर्दीसाठी जबाबदार असलेल्या विषाणूंशी लढण्यासाठी आवश्यक असतात.

व्हिटॅमिन सी मुळे सर्दी कमी होते का?

व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांच्या सेवनाने सर्दीची तीव्रता कमी होण्यासह काही संभाव्य फायदे अनेक अभ्यासक्रमात सुचवलेले आहेत. पण तरी सुद्धा ठोस पुराव्यांचं अभावे व्हिटॅमिन सी व सर्दी असा परस्पर संबंध सिद्ध होत नाही. कोक्रेन डेटाबेस ऑफ सिस्टिमॅटिक रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित मेटा-विश्लेषणामध्ये अनेक चाचण्यांची तपासणी करण्यात आली होती. ज्यानुसार, नियमितपणे व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेत असलेल्या व्यक्तींमध्ये सर्दी होण्याच्या कालावधीत किंचित घट झाल्याचे आढळले. मात्र, प्रभाव अत्यंत आश्वासक नव्हता कारण अंदाजे अर्ध्या दिवसाने सर्दीचा कालावधी कमी झाल्याचे आढळून आले होते.

शिवाय, सर्दी रोखण्यासाठी व्हिटॅमिन सीचा प्रभाव विविध लोकांमध्ये वेगवेगळा दिसून आला होता. खेळाडू, कठीण शारीरिक श्रम किंवा पर्यावरणीय परिस्थितीच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती आणि अधिक तणावाखाली असलेल्यांना नियमितपणे व्हिटॅमिन सी पूरक आहार घेतल्यास सर्दी कमी होण्याचा अनुभव येऊ शकतो. पण सामान्य लोकांमध्ये सर्दीवर उपाय म्हणून व्हिटॅमिन सीला समर्थन देणारे पुरावे आढळून आलेले नाहीत.

अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास फरक वाटू शकतो का?

व्हिटॅमिन सी आणि सर्दी संबंधी प्रचलित समजुतींपैकी एक म्हणजे ‘मेगाडोसिंग’. थोडक्यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन करणे, यासाठी काही वेळा शिफारस केलेल्या प्रमाणाच्या पेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ आहारात समाविष्ट केले जातात. मात्र इथे हे लक्षात घ्यायला हवे की, शरीर दिलेल्या वेळेत केवळ विशिष्ट प्रमाणात व्हिटॅमिन सी शोषून घेऊ शकते आणि जास्त प्रमाणात डोस सामान्यतः मूत्राद्वारे उत्सर्जित केला जातो. तसेच अधिक सेवनाने अधिक फायदे हा दावा सिद्ध झालेला नाही.

गोळ्या औषधांना संत्री पर्याय ठरतात का?

व्हिटॅमिन सीच्या सेवनाची पद्धत देखील त्याच्या प्रभावावर परिणाम करू शकते. सप्लिमेंट्सचा वापर सामान्यतः केला जात असताना, व्हिटॅमिन सी-समृद्ध पदार्थांचे सेवन इतर आवश्यक पोषक आणि फायटोकेमिकल्स अतिरिक्त आरोग्य फायदे देऊ शकतात. लिंबूवर्गीय फळे, भोपळी मिरची, स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोली हे या जीवनसत्वाचा मुबलक नैसर्गिक स्रोत आहेत.

हे ही वाचा<< थंडीत रोज संत्री खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिटॅमिन सीचा प्रभाव हा वर म्हटल्याप्रमाणे, वय, एकूण आरोग्य आणि बेसलाइन व्हिटॅमिन सी पातळी यासारख्या घटकांवर आधारित असतो. विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींना व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्सच्या अतिसेवनामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता, किडनी स्टोन यासारखे त्रास होऊ शकतात. व्हिटॅमिन सी संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देते परंतु सामान्य सर्दीसाठी झटपट उपचार म्हणून त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक घटक आहेत.